अमरावती जिल्ह्यात १४ नवीन वीज उपकेंद्र

पाच उपकेंद्रांची क्षमता वाढणार वीज यंत्रणा होणार अधिक सक्षम

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
अमरावती,
amravati-electricity-substation : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वीज यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी महावितरणकडून व्यापक पावले उचलण्यात येत आहेत. आशियायी विकास बँकेच्या साहाय्याने जिल्ह्यात ३३ केव्ही क्षमतेची १४ नवीन उपकेंद्रे उभारली जाणार आहेत. यासोबतच ५ उपकेंद्रांमध्ये नवीन अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवणे आणि दोन उपकेंद्रांची क्षमता वाढवणे अशी कामे हाती घेण्यात आली आहेत. या विकासकामांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळण्यास मोठी मदत होईल, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली आहे.
 
 
;lk
 
या ग्रामीण ऊर्जा विकास योजनेसाठी एकूण ८६ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये ३३ केव्ही क्षमतेच्या १४ नवीन उपकेंद्रांच्या उभारणीसोबतच जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर, लोणी, अंजनसिंगी, पाळा भिवकुंडी आणि गाडेगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी ५ एमव्हीए क्षमतेचा १ याप्रमाणे ५ नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवले जाणार आहेत. तसेच धारणी उपकेंद्राची क्षमता २.५ एमव्हीएवरून ५ एमव्हीए आणि ब्राम्हणवाडा उपकेंद्राची क्षमता ५ एमव्हीएवरून थेट १० एमव्हीएपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
 
 
 
या सर्व कामांचे कंत्राट मे. अग्रवाल पॉवर प्रा. लि. या विकासक कंपनीला देण्यात आले असून, ही कामे डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. नवीन उपकेंद्र जोडण्यासाठी २३७ किलोमीटर लांबीची ३३ केव्ही वीज वाहिनी आणि २१३ किलोमीटर लांबीची ११ केव्ही वाहिनी टाकली जाणार आहे. याव्यतिरिक्त ५ उपकेंद्रांमध्ये कॅपासिटर बँक बसवण्यात येणार असून जिल्ह्यातील १०९ रोहित्रांची (ट्रान्सफॉर्मर) क्षमतादेखील वाढवली जाणार आहे. मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनात आणि अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा अनिल काळे यांच्या देखरेखिखाली हे काम होणार आहे. नवीन उपकेंद्रांच्या जागेच्या सर्वेक्षणाचे काम स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता शंशांक पोंक्षे यांच्या पथकाकडून अतीरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद खंडारे यांच्या नेतृत्वात पूर्ण झाले आहे. १४ पैकी १२ उपकेंद्रांच्या जागा आधीच विकासकाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.