तभा वृत्तसेवा
दारव्हा,
darwha-news : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मुंगसाजी महाराज संत मंदिर (जुने), दारव्हा यांच्या वतीने भव्य नगर प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषाने आणि ज्ञानोबा-तुकारामच्या नामगजराने संपूर्ण दारव्हा नगरी भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेली.
सकाळी टाळ, मृदुंग, वीणा, पताका आणि पालखीच्या दिमाखदार मिरवणुकीसह नगर प्रदक्षिणेला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पालखी शी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचली. तेथे महाआरती झाल्यानंतर पालखी पुन्हा शी मुंगसाजी महाराज संत मंदिर (जुने) येथे दाखल झाली.
मंदिर परिसरात सर्व वारकरी व माऊली भक्तांनी पारंपरिक फुगड्या खेळत आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला. त्यानंतर शी मुंगसाजी माऊलीची आरती करण्यात आली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या विविध महिला भजनी मंडळांचा सन्मान करण्यात आला.
या नगर प्रदक्षिणा सोहळ्यात मुंगसाजी महाराज भजनी मंडळ, महालक्ष्मी महिला भजनी मंडळ, श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ, शी शिवाय महिला भजनी मंडळ, शीतला माता महिला भजनी मंडळ तसेच शी लाल महाराज महिला भजनी मंडळ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण सोहळा विठ्ठलाच्या अखंड नामघोषात, भक्तिरसात आणि वारकरी परंपरेच्या उत्साहपूर्ण वातावरणात झाला.