दतियात भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला!

बॅनर फाडल्याने राजकीय वातावरण तापले

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
दतिया,
Attack on BJP campaign vehicle in Datia विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील दतिया येथे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिग्ना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदगवान गावात भाजपच्या प्रचार वाहनावरील बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे. आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या सभेतून परतणाऱ्या काही लोकांनी हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी जिग्ना पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भाजपच्या प्रचार वाहनावरील पोस्टर फाडण्यात आल्याचा आरोप असून, या घटनेनंतर परिसरातील राजकीय वातावरण अधिकच चिघळले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, दतिया विधानसभा मतदारसंघात ३० जुलै २०२६ रोजी मतदान होणार असून, ३ ऑगस्ट २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. काँग्रेसचे आमदार राजेंद्र भारती यांना फसवणुकीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
 
 

Attack on BJP campaign vehicle in Datia 
 
भाजपने या निवडणुकीसाठी आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसकडून घनश्याम सिंह निवडणूक लढवत आहेत. नरोत्तम मिश्रा यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाने आशुतोष तिवारी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. विशेष म्हणजे, २०२३ मध्ये या मतदारसंघातून नरोत्तम मिश्रा यांचा पराभव झाला होता. त्यामुळे भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे.तिकीट न मिळूनही नरोत्तम मिश्रा भाजपच्या प्रचारात सक्रिय आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख नेते मतदारसंघात प्रचार करत आहेत. वाहन रॅली, बूथ पातळीवरील संघटन आणि विकासकामांचा मुद्दा भाजपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू आहे. दुसरीकडे, काँग्रेसने घरोघरी संपर्क, छोट्या सभा आणि संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला आहे.
 
या पोटनिवडणुकीकडे दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिले जात आहे. भाजपला हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घ्यायचा आहे, तर काँग्रेससमोर आपला गड कायम राखण्याचे आव्हान आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी प्रचार वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. दरम्यान, अलीकडेच मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दतिया येथे नरोत्तम मिश्रा यांच्यासोबत प्रचारसभा घेतली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, काँग्रेसचा नाश इतर कोणी नव्हे तर तिच्या स्वतःच्या कर्मांमुळेच होईल, असा दावा केला होता. आता दतियाच्या मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.