अरे देवा...कर्करोगाची माशांमध्येही ‘एन्ट्री’?

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
व्हरमाँट/क्युबेक,
Cancer also enters fish कर्करोग म्हटले की तो एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या शरीरात विकसित होणारा आजार म्हणून ओळखला जातो. मात्र, आता शास्त्रज्ञांसमोर कर्करोगाचा एक अत्यंत दुर्मिळ प्रकार समोर आला आहे. हा कर्करोग एका माशाच्या शरीरातून दुसऱ्या माशाच्या शरीरात पसरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या अनोख्या शोधाने वैज्ञानिक क्षेत्रात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.‘नेचर’ नियतकालिकात प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासानुसार, अमेरिकेतील व्हरमाँट आणि कॅनडातील क्युबेक या भागांदरम्यान असलेल्या मेम्फ्रेमागॉग सरोवरातील ब्राऊन बुलहेड कॅटफिशमध्ये हा कर्करोग आढळला आहे. या माशांमध्ये दिसून आलेला मेलेनोमा प्रत्येक माशाच्या शरीरात स्वतंत्रपणे तयार झालेला नसून, त्याच्या कर्करोगाच्या पेशी एका माशापासून दुसऱ्या माशापर्यंत पोहोचत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
 
 

FISH 
 
 
 
वैज्ञानिकांच्या मते, माशांमध्ये आढळलेला हा पहिला ज्ञात संसर्गजन्य कर्करोग आहे. विशेष म्हणजे गोड्या पाण्यातील परिसंस्थेत अशा प्रकारचा कर्करोग आढळण्याची ही पहिलीच नोंद मानली जात आहे. सामान्य कर्करोगात शरीरातील पेशींमध्ये जनुकीय बदल होऊन त्यांची अनियंत्रित वाढ होते. मात्र, संसर्गजन्य कर्करोगात जिवंत कर्करोगाच्या पेशी एका जीवातून बाहेर पडून दुसऱ्या जीवाच्या शरीरात प्रवेश करतात आणि तेथे वाढू लागतात.या निष्कर्षाची खातरजमा करण्यासाठी संशोधकांनी बाधित माशांच्या गाठी आणि त्यांच्या निरोगी ऊतींच्या जनुकीय रचनेचा अभ्यास केला. वेगवेगळ्या माशांमध्ये आढळलेल्या गाठींची जनुकीय रचना एकमेकांशी मोठ्या प्रमाणात जुळत असल्याचे दिसून आले. मात्र, त्या माशांच्या निरोगी पेशींपेक्षा या गाठींची रचना वेगळी होती. अनेक अनुवांशिक वैशिष्ट्ये वेगवेगळ्या माशांमधील गाठींमध्ये समान आढळली, ज्यामुळे त्या स्वतंत्रपणे विकसित न होता एकाच कर्करोगाच्या पेशीसमूहातून निर्माण झाल्याचा शास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे.
 
 
प्राण्यांमध्ये नैसर्गिकरित्या पसरणाऱ्या कर्करोगाची उदाहरणे यापूर्वी कुत्रे, टास्मानियन डेव्हिल्स आणि काही सागरी शिंपल्यांमध्ये आढळली आहेत. आता ब्राऊन बुलहेड कॅटफिशचाही या दुर्मिळ यादीत समावेश झाला आहे.मात्र, हा कर्करोग एका माशापासून दुसऱ्या माशापर्यंत नेमका कसा पोहोचतो, याचे निश्चित उत्तर अद्याप शास्त्रज्ञांना मिळालेले नाही. प्रजननाच्या काळात हे मासे मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि एकमेकांच्या अगदी जवळ राहतात. त्यामुळे कर्करोगाच्या जिवंत पेशींचा थेट प्रसार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय, पाण्यातील कर्करोगाच्या पेशी माशांच्या त्वचेच्या, कल्ल्यांच्या किंवा तोंडाच्या संपर्कातून शरीरात प्रवेश करू शकतात, अशीही शक्यता आहे.
 
 
ब्राऊन बुलहेड कॅटफिश सरोवराच्या तळाशी राहतात आणि त्यांच्या शरीरावर संरक्षक खवले नसतात. त्यामुळे तलावाच्या तळातील चिखलात काही काळ टिकून राहिलेल्या कर्करोगाच्या पेशींचा इतर माशांशी संपर्क येऊ शकतो, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. मात्र, संसर्गाचा नेमका मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही. या शोधामुळे हा कर्करोग मानवांमध्येही पसरू शकतो का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, सध्याच्या वैज्ञानिक पुराव्यांनुसार मानवांना यापासून कोणताही धोका असल्याचे आढळलेले नाही. हा अभ्यास केवळ ब्राऊन बुलहेड कॅटफिशवर आधारित आहे. मानवी रोगप्रतिकारक यंत्रणा सामान्यतः दुसऱ्या जीवाच्या परकीय पेशींना ओळखून त्यांचा नाश करते. त्यामुळे या माशांमध्ये आढळलेला संसर्गजन्य कर्करोग मानवांमध्ये पसरण्याची शक्यता सध्या अत्यंत कमी मानली जात आहे.