गोंदिया,
deori amgaon भरधाव कार पुलावरून थेट नहरात कोसळून कारमधील एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना देवरी-आमगाव मार्गावरील हरदोली शेतशिवारात सोमवारी 27 जुलै रोजी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात चालकासह इतर तीघेजण गंभीर जखमी झाले. चालकाला झोपेची डुलकी आल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. लीलाबाई गौतम (66) असे मृत महिलेचे नाव असून विजय गौतम (48), सरिता गौतम (40) आणि कार चालक यश लक्षणे (24) सर्व राहणार साखरीटोला अशी गंभीर जखमींची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम कुटूंबीय रविवारी नागपूरहून साखरीटोला येथे कार क्रमांक एमएच-35 एजे-3777 ने येत असताना मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास हरदोली शेतशिवारातील पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने पुलाचा कठडा तोडत थेट नहरात झेप घेतली. या अपघातात लीलाबाई गौतम यांचा जागीच मृत्यू झाला. तर विजय गौतम, सरिता गौतम व कार चालक यश लक्षणे हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी चालकाला झोपेची डुलकी लागल्यामुळे वाहनावरील ताबा सुटल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान, सालेकसा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.