राजधानी दिल्लीतही निघाली वारी

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
दिल्ली
delhi wari  सुमारे ७५० वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या पंढरपूरच्या वारीचे प्रतीकात्मक स्वरूप असलेली वारी राजधानी दिल्लीतही निघाली आहे. हनुमान मंदिर, कनॉट प्लेस येथून भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. दिल्ली-एनसीआर परिसरातील तीन हजारांहून अधिक भाविकांनी वारीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
 

delhi wari 2026 over 3000 devotees join symbolic pandharpur wari in national capital 
दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे सलग सहाव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या वारीत समाजातील विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेषतः दिल्ली-एनसीआरमध्ये वास्तव्यास असलेले मराठी अधिकारी, डॉक्टर, संरक्षण दलातील अधिकारी व जवान, निमलष्करी (पॅरामिलिटरी) दलातील अधिकारी व कर्मचारी, तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांतील मराठी कुटुंबांनी या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होत वारकरी परंपरेचा वारसा जपला. वारीच्या संपूर्ण मार्गावर विविध सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांनी वारकऱ्यांचे पिण्याचे पाणी, फळांचे रस आणि फळे देऊन मनःपूर्वक स्वागत केले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी नॉर्थ अव्हेन्यू येथे वारकऱ्यांचे स्वागत करून वारीत सहभाग घेतला. खासदार मनोज तिवारी यांनी सरदार पटेल मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी वारकऱ्यांचे स्वागत केले. तसेच खासदार सौ. मायाताई इवनाते यांनीही वारीत सहभागी होत वारकऱ्यांसमवेत पदयात्रा केली. आर के पूरम येथे स्थानिक आमदार श्री अनिल शर्मा यांनीही वारी चे स्वागत केले. आर. के. पुरम येथील विठ्ठल मंदिरातून निघालेली पालखी या वारीत सहभागी झाली. त्यानंतर सर्व वारकरी पालखीसमवेत विठ्ठल मंदिरापर्यंत पदयात्रा करत गेले आणि भक्तिमय वातावरणात वारीची सांगता झाली.
दिल्ली मराठी प्रतिष्ठान गेल्या सहा delhi wari  वर्षांपासून दिल्ली सांकेतिक वारीचे सातत्याने आयोजन करत असून, दरवर्षी सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या आणि उत्साह लक्षणीयरीत्या वाढत आहे. विशेषतः तरुण पिढी, लहान मुले आणि संपूर्ण कुटुंबांचा वाढता सहभाग ही या उपक्रमाची मोठी जमेची बाजू ठरत आहे. या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारकरी परंपरा राष्ट्रीय राजधानीत जपली जात असून ती पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य होत आहे.
 
 
दिल्लीत प्रथमच मराठी चित्रपट महोत्सव
दिल्ली सांकेतिक वारीची सांगता आर. के. पुरम येथील विठ्ठल मंदिरात झाल्यानंतर दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. ७, ८ आणि ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, जनपथ, नवी दिल्ली येथे दिल्लीतील पहिला मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. हा महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, महाराष्ट्र शासनाच्या फिल्म सिटी महामंडळ, एफटीआयआय (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया), पुणे आणि एनएफडीसी (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे.