चेन्नई,
Dhanush also enters politics तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक धनुष यांच्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे. रविवारी चाहत्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सहभागी झाल्यानंतर धनुष यांनी चाहत्यांना सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांच्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर धनुष लवकरच तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करणार का, याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे. धनुष यांनी चाहत्यांच्या एकजुटीचे कौतुक करताना सांगितले की, चाहत्यांची सामूहिक ताकद केवळ चित्रपटांच्या ध्वनिफितीच्या प्रकाशन सोहळ्यांपुरती किंवा चाहतावर्गाच्या कार्यक्रमांपुरती मर्यादित राहू नये. हीच ताकद समाजाच्या मदतीसाठी वापरली पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आणि कुटुंबीयांच्या गरजा समजून घेऊन त्यांना शक्य ती मदत करण्याचे आवाहन त्यांनी चाहत्यांना केले.
धनुष यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर त्यांच्या राजकारण प्रवेशाबाबत सोशल मीडियावर तर्कवितर्क सुरू झाले. काही वापरकर्त्यांनी धनुष तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली. काहींनी त्यांच्या संभाव्य राजकीय प्रवेशाचे स्वागत केले, तर काही चाहत्यांनी ते लवकरच स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा करू शकतात, असा अंदाज व्यक्त केला. अभिनेता थलापति विजय यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर धनुष यांच्या भूमिकेची तुलना आता त्यांच्याशी केली जात आहे. मात्र, धनुष यांनी अद्याप राजकारणात प्रवेश करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे केवळ चर्चांना उधाण आले आहे.याच कार्यक्रमात धनुष यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरून सुरू असलेल्या चर्चेवरही आपली भूमिका मांडली. २०२४ मध्ये त्यांच्या दिग्दर्शनाखालील ‘रायन’ या चित्रपटापेक्षा चांगले तामिळ चित्रपट होते, हे त्यांनी मान्य केले. मात्र, या विषयावर वाद घालण्याऐवजी एका तामिळ कलाकाराने एकाच वर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले, याचा आनंद साजरा करायला हवा, असे त्यांनी सांगितले.
‘कॅप्टन मिलर’मधील अभिनयासाठी धनुष यांना विशेष उल्लेख मिळाला, तर त्यांच्या ‘रायन’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘कॅप्टन मिलर’ला मिळालेल्या सन्मानावर सोशल मीडियावर काही प्रमाणात चर्चा झाली, तर ‘रायन’ला मिळालेल्या पुरस्कारावर अधिक टीका झाली. त्या वर्षी इतर काही तामिळ चित्रपट या पुरस्कारासाठी अधिक पात्र होते, असे अनेकांचे मत होते. पुरस्कारांच्या घोषणेनंतर धनुष यांनी ज्येष्ठ अभिनेते ममूटी यांच्यासोबत आनंद साजरा केला होता. ‘ओम’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचा एकत्रित फोटोही समोर आला होता. त्यामुळे धनुष यांच्या सामाजिक कार्यातील सक्रियतेनंतर त्यांच्या संभाव्य राजकीय प्रवेशाची चर्चा सध्या तामिळनाडूत रंगली आहे.