नवी दिल्ली,
Digital entry of RHA after CJP सोशल मीडियाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)च्या आंदोलनानंतर आता विविध मुद्द्यांवर डिजिटल मोहिमा उभ्या राहताना दिसत आहेत. विशेषतः इंस्टाग्राम हे जेन-जी पिढीच्या नव्या आंदोलनांचे प्रभावी व्यासपीठ बनत असल्याचे चित्र आहे. सीजेपीच्या डिजिटल मोहिमेनंतर आता आरक्षणाच्या मुद्द्यावर ‘रिझर्वेशन हटाओ आंदोलन’ (आरएचए) या अकाउंटने मोठी झेप घेतली आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्या या इंस्टाग्राम अकाउंटचे फॉलोअर्स तब्बल ३५ लाखांवर पोहोचले आहेत. जनरल आणि काही ओबीसी प्रवर्गातील तरुणांनी या डिजिटल मोहिमेला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. जातीनुसार दिले जाणारे आरक्षण पूर्णपणे रद्द करून सरकारी नोकऱ्या आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी गुणवत्ता, गुण आणि पात्रता हे निकष असावेत, अशी या मोहिमेतील समर्थकांची मागणी आहे.

आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी आर्थिक निकषांचा वापर करावा, अशी भूमिका आरएचएच्या माध्यमातून मांडली जात आहे. ‘आरक्षण म्हणजे भेदभाव’ अशा घोषणांसह या अकाउंटवरून आरक्षणविरोधी भूमिका मांडली जात आहे. सीजेपीच्या धर्तीवर या डिजिटल मोहिमेचे मोठ्या आंदोलनात रूपांतर करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला जात आहे. सीजेपीच्या आंदोलनानंतर सोशल मीडियावरून थेट जनआंदोलन उभे करण्याची नवी पद्धत चर्चेत आली आहे. मात्र, आरक्षण हा अत्यंत संवेदनशील आणि घटनात्मक विषय असल्याने आरएचएच्या डिजिटल मोहिमेला भविष्यात किती व्यापक स्वरूप मिळते, याकडे आता लक्ष लागले आहे.याचदरम्यान, पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाच्या मुद्द्यावर ई२० जनता पार्टी नावाचे आणखी एक डिजिटल अभियानही वेगाने वाढत असून, त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला १ लाख ५४ हजार फॉलोअर्स असल्याचे सांगितले जात आहे.