कानपूर,
First wife's entry at second wedding दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाच्या विवाहसोहळ्यात अचानक पहिली पत्नी दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. “ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी आहे,” असे म्हणत तिने लग्नाला विरोध केला. या प्रकारामुळे नववधूसह वऱ्हाडी मंडळींमध्ये मोठा गोंधळ उडाला. परिस्थिती चिघळल्यानंतर नवरदेवाने तेथून पळ काढल्याची माहिती आहे.ही घटना कानपूरमधील चकेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या श्याम नगर परिसरात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. विवाहसोहळा सुरू असतानाच नवरदेवाची पहिली पत्नी अचानक लग्नाच्या लॉनमध्ये पोहोचली. आपण नवरदेवाची कायदेशीर पत्नी असल्याचा दावा करत तिने सुरू असलेला विवाह थांबवला. त्यानंतर जवळपास एक तास लग्नस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, चमनगंज परिसरात राहणाऱ्या या महिलेचे 2022 मध्ये जुही लाल कॉलनीतील एका तरुण इंटिरियर व्यावसायिकासोबत लग्न झाले होते. मात्र, विवाहानंतर काही काळातच दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाही पतीने दुसरे लग्न करण्याची तयारी केल्याचा आरोप महिलेने केला आहे.नवरदेवाच्या शेजाऱ्याकडून दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाल्यानंतर महिलेने पती, सासरे आणि इतर नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ती आपल्या बहिणीसोबत थेट विवाहस्थळी पोहोचली आणि लग्नाला विरोध केला. पहिली पत्नी अचानक समोर आल्याने नववधूसह वऱ्हाडी मंडळींमध्ये मोठी खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच चकेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी नवरदेवाला ताब्यात घेत दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांची चौकशी करण्यात आली आणि रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू होती.चकेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय प्रकाश मिश्रा यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. दोन्ही पक्षांचे लेखी जबाब घेण्यात आले असून, तक्रारी आणि उपलब्ध तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, संबंधित महिलेने नवरदेवाशी अद्यापही दररोज व्हॉट्सॲपवर संवाद होत असल्याचा दावा केला आहे. तसेच दोघांची महिन्यातून अनेक वेळा भेट होत असल्याचेही तिने सांगितले. त्यामुळे पहिल्या विवाहाचा कायदेशीर वाद सुरू असतानाच दुसऱ्या लग्नाची तयारी का करण्यात आली, याचा तपास आता पोलीस करत आहेत.