नागपूर,
free health checkup camp नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्याची नियमित तपासणी व्हावी, या उद्देशाने पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून ‘नागपूर पोलीस हेल्थ मिशन’अंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अप्पर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्रमांक ३, राहुल मदने यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले. भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन, आय.एफ.पी.डब्ल्यू.डी., सिक्स सिग्मा हॉस्पिटल, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नागपूर आणि मिठास हेल्थकेअर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर पार पडले.

शिबिरात परिमंडळ क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या सहा पोलीस ठाण्यांतील सुमारे ८० अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. यावेळी रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, सामान्य शारीरिक तपासणी तसेच विविध आजारांचे प्राथमिक निदान करण्यात आले. याशिवाय संतुलित आहार, योगाभ्यास आणि निरोगी जीवनशैलीबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांनी नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे आणि त्यांच्या पथकाने विशेष सहकार्य केले.
‘सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस’ या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम ठरला.
सौजन्य: सतीश तोडासे, संपर्क मित्र