धक्कादायक खुलासा : मी सुद्धा कास्टिंग काऊचची बळी

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
मुंबई
hema sardesai बॉलिवूडमधील अनेक महिला कलाकार वेळोवेळी त्यांना आलेल्या कटू अनुभवांबद्दल उघडपणे बोलताना दिसतात. मात्र, काहींनी सतत होणाऱ्या अवांछित मागण्यांना कंटाळून झगमगत्या मनोरंजनविश्वालाच कायमचा रामराम ठोकला. लोकप्रिय पार्श्वगायिका हेमा सरदेसाई यांचाही अनुभव काहीसा असाच होता. ‘बादल पे पांव है’, ‘है जवानी तो इश्क होना है’ आणि ‘आवारा भंवरे’ यांसारख्या गाजलेल्या गीतांना आवाज देणाऱ्या हेमा सरदेसाई यांनी गायिकांनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो, असा धक्कादायक खुलासा केला आहे. याच अनुभवांमुळे आपण मनोरंजन क्षेत्रापासून दूर गेल्याचेही त्यांनी सांगितले.
 

hema sardesai 
कास्टिंग काऊचच्या विषयावर सुरुवातीला बोलण्यास त्यांनी अनिच्छा व्यक्त केली. हा विषय चांगला नसल्याने त्यावर बोलणे योग्य वाटत नसल्याचे सांगत त्या म्हणाल्या, “कास्टिंग काऊचबद्दल बोलणं योग्य नाही, कारण ही काही चांगली गोष्ट नाही. कोणी शारीरिक संबंधांची मागणी केली की मी थेट नकार द्यायची. त्यावर मला ‘तुला गाणं मिळणार नाही’ असं सांगितलं जायचं. मात्र, माझं उत्तर असायचं की संगीतविश्वात केवळ एकच दिग्दर्शक नसतो, गाणी देणारे इतरही अनेक लोक असतात. प्रत्येकाचं कर्म ठरलेलं असतं आणि अशा प्रसंगी मी तिथून थेट निघून जायची.”
यापुढे बोलताना त्यांनी संमतीच्या मुद्द्यावरही आपलं मत व्यक्त केलं. “अनेक प्रकरणांमध्ये ‘त्याने फक्त माझा उपयोग केला’ असं सांगितलं जातं. पण अशा गोष्टी महिला आणि पुरुष या दोघांच्या संमतीने घडतात. जेव्हा तुम्ही परवानगी देता, तेव्हा तुम्ही स्वतः तुमचा उपयोग होऊ देता. हे देखील तितकंच चुकीचं आहे, जितकं एखाद्याला मोलेस्टर किंवा रेपिस्ट म्हणणं चुकीचं आहे,” असे त्या म्हणाल्या.
 
 
हेमा सरदेसाई यांनी पुढे सांगितले की, “मीदेखील यासंदर्भात एक पोस्ट लिहिली होती आणि ती अतिशय समजूतदारपणे मांडली होती. मी कधीच त्या पुरुषाला क्लीन चिट दिली नसती. मात्र, तो मोलेस्टर किंवा रेपिस्ट नव्हता. समोरून प्रस्ताव ठेवला जातो, तो स्वीकारायचा की नाही, हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असतं. कारण कोणीही कोणावर दबाव टाकत नाही. जे काही घडतं, ते तुमच्या इच्छेने घडतं. आणि जर असं काही घडलं असेल, तर त्या संबंधित पुरुषाला त्याची शिक्षा मिळाली आहे.”यावेळी त्यांनी मनोरंजन क्षेत्राबाबत आणखी एक मोठा खुलासा केला. मात्र, कोणाचेही नाव घेण्यास त्यांनी नकार दिला. “जर तुम्ही एखाद्याचं नाव घेत असाल, तर त्याची जबाबदारीही तुमचीच असते. मी ज्या व्यक्तीबद्दल बोलते आहे, त्याच्यावर ‘मीटू’ मोहिमेदरम्यान आरोप झाले होते. मात्र, तो मोलेस्टर किंवा रेपिस्ट नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. उल्लेखनीय म्हणजे, ‘मीटू’ मोहिमेदरम्यान बॉलिवूडमधील अनेक पुरुष सेलिब्रिटींवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते., हेमा सरदेसाई यांनी आता ग्लॅमरच्या दुनियेला पूर्णविराम दिला असून त्या सध्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने त्यांनी हा मार्ग स्वीकारल्याचेही त्यांनी सांगितले.