नवी दिल्ली,
medical tourism भारत आता केवळ स्वस्त उपचारांचे ठिकाण नाही, तर वैद्यकीय पर्यटनाचे एक मोठे जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. २००९ मध्ये जिथे १.१२ लाख विदेशी रुग्ण उपचारांसाठी भारतात आले होते. २०२५ मध्ये ही संख्या वाढून ५.०७ लाख झाली. म्हणजेच १६ वर्षांत विदेशी रुग्णांची संख्या सुमारे ४.५ पटीने वाढली.
या वाढीचे कारण कमी खर्चात उपचार तसेच भारतात तज्ज्ञ डॉक्टर्स लवकर उपलब्ध होणे हे आहे. याशिवाय, तपासणी अहवाल त्वरित मिळणे आणि उपचाराचा खर्च आधीच निश्चित असणे हे देखील विदेशी रुग्णांना आकर्षित करत आहे. अमेरिकेत ज्या उपचारावर १५ हजार रुपये खर्च होतात, तोच उपचार भारतात एक ते दोन हजार रुपयांमध्ये शक्य आहे. नेदरलँड्समध्ये दातांच्या सामान्य उपचारावर १६ हजार रुपये जास्त लागतात, तर लखनौमध्ये हाच उपचार तीन हजार रुपयांमध्ये होतो. यामध्ये बांगलादेश, इराक, उझबेकिस्तान, सोमालिया, ओमान आणि केनियामधून मोठ्या संख्येने रुग्ण भारतात पोहोचले. भारताचे वैद्यकीय पर्यटन बाजार २०२५ मध्ये ८४ हजार कोटी रुपयांचे होते. २०३० पर्यंत ते वाढून १.५६ लाख कोटी रुपये होईल, असा अंदाज आहे.
भारताकडे वैद्यकीय पर्यटन हाताळण्यासाठी मोठी आरोग्य पायाभूत सुविधा देखील उपलब्ध आहे. देशात एकूण ६९,३६४ रुग्णालये आहेत. यापैकी ४३,४८६ खाजगी आणि २५,७७८ सरकारी रुग्णालये आहेत. १२ लाख नोंदणीकृत डॉक्टर आहेत. १,२९९ रुग्णालयांना रुग्णालये आणि आरोग्यसेवा देणाऱ्या राष्ट्रीय मान्यता मंडळाची मान्यता आहे. १७२ देशांना भारत आता ई-मेडिकल व्हिसा देत आहे.
भारताबद्दल वाढला विश्वास
पूर्वी जे उपचारांसाठी तुर्कस्तान आणि थायलंडला जात होते ते रुग्ण देखील आता भारतात उपचारासाठी येत आहेत. याची कारणे म्हणजे तज्ञ डॉक्टर, रुग्णालयांची मान्यता आणि खर्चातील मोठा फरक ही होय. डिजिटल माध्यमांमुळे आता रुग्ण डॉक्टर, रुग्णालय आणि उपचारांच्या प्रक्रियेची माहिती आधीच मिळते. यामुळे उपचारकर्त्यांसह कुटूंबियांचा विश्वास वाढला आहे.