भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत सरकार कठाेर

परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या राजदूतांना बोलावले

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
indian-naval-security : भारताने काळ्या समुद्राच्या प्रदेशातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेसंदर्भात एक मोठे राजनैतिक पाऊल उचलले आहे. युक्रेनच्या ओडेसा बंदरात भारतीय कर्मचारी असलेल्या ‘एमव्ही एजीएन रॅग्नर’ या मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी युक्रेनचे राजदूत डॉ. ओलेक्झांडर पोलिशचुक यांना बोलावले.
 
 
indian-naval-security
 
 
 
या जहाजावर चार भारतीय कर्मचारी होते. या घटनेनंतर भारताने स्पष्ट केले की, संघर्षग्रस्त भागांमध्ये काम करणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षा हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. गत आठवड्यात भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजांशी संबंधित ही तिसरी गंभीर घटना आहे. गत आठवड्यातही एमव्ही गोल्डन लिओ नावाच्या व्यापारी जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशी ठार झाले. त्या घटनेनंतर, परराष्ट्र मंत्रालयाने रशियाचे कार्यवाहक राजदूत व्लादिमीर लादानोव्ह यांना बोलावले हाेते.
 
 
भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, शनिवारी युक्रेनच्या ओडेसा बंदरात ’एमव्ही एजीएन रॅग्नर’वर हल्ला झाला. ओडेसा हे काळ्या समुद्रावरील एक प्रमुख बंदर आहे आणि २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून या बंदरावर अनेक हल्ले झाले आहेत. जहाजावर चार भारतीय खलाशी होते. दूतावासाने कळवले आहे की, दोन भारतीय खलाशी सुखरूप सापडले असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. १८ जुलैपासून काळ्या समुद्राच्या प्रदेशात झालेल्या हल्ल्यांमध्ये एकूण पाच भारतीय खलाशांनी आपले प्राण गमावले आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांवर चिंता व्यक्त करत भारताने दोन्ही पक्षांकडे भारतीय नागरिकांच्या आणि भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजांच्या सुरक्षेचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला आहे.
सुरक्षेच्या धोक्यांचे सखोल मूल्यांकन करावे
 
परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी भारतीय नागरिकांसाठी एक सूचना जारी केली. त्यात म्हटले आहे की, संघर्षग्रस्त पाण्यात कार्यरत असलेल्या व्यापारी जहाजांवर काम करण्याची योजना असलेल्या भारतीय नागरिकांनी सुरक्षेच्या धोक्यांचे सखोल मूल्यांकन करावे. संघर्षग्रस्त भागात काम करणाऱ्या भारतीय खलाशांनी अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेवर सतत लक्ष ठेवून असून अशा बाबींवर संबंधित देशांच्या थेट संपर्कात आहे.