‘इंडिगो’चे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
राजकोट, 
emergency-landing : इंडिगोच्या दुबईहून मुंबईला जाणाऱ्या विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या कार्गो कंपार्टमेंटमधून धुराचा इशारा मिळाला. या माहितीनंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली़ दरम्यान, पायलटने तात्काळ विमान वळवण्याचा निर्णय घेत राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. विमानात एकूण १९४ प्रवासी होते. विमान सुरक्षितपणे उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
 
 
emergency-landing
 
आपत्कालीन लँडिंगची माहिती मिळताच, राजकोट विमानतळ प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. स्थानिक प्रशासनानेही तात्काळ प्रतिसाद दिला. विमानतळाच्या धावपट्टीवर सर्व आपत्कालीन सुरक्षा नियमावली लागू करण्यात आली. याव्यतिरिक्त, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी राजकोट अग्निशमन विभागाकडील अनेक अग्निशमन गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथकही विमानतळावर दाखल झाले. गरज भासल्यास तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून परिस्थितीवर लक्ष ठेवले आणि संपूर्ण मोहीम सुरक्षितपणे पार पाडली.