संसाराच्या स्वप्नांचा शेवट २९ तरुणांच्या मृत्यूने!

जळगावमध्ये लग्नाचा प्रश्न गंभीर

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
जळगाव,
issue of marriage in Jalgaon लग्नासाठी योग्य जोडीदार न मिळणे आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक तणाव हा जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी गंभीर सामाजिक प्रश्न बनत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी केलेल्या विश्लेषणानुसार, गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात २९ तरुणांनी लग्न न झाल्याच्या कारणातून आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. या धक्कादायक आकडेवारीमुळे सामाजिक आणि मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत एकूण ४३१ आत्महत्यांची नोंद झाली आहे. यामध्ये ३८३ पुरुष, आठ अल्पवयीन मुले, २९ महिला आणि ११ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात दररोज सरासरी दोन ते तीन आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. आत्महत्यांच्या संख्येत पुरुषांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
 
 
 
issue of marriage in Jalgaon
 
पुरुषांच्या आत्महत्यांमागील कारणांचा अभ्यास केल्यानंतर पोलिसांना विविध कारणे आढळून आली. दारूच्या व्यसनामुळे ९० पुरुषांनी, नैराश्यामुळे ७४ जणांनी, कौटुंबिक वादातून ६४ जणांनी, कर्जबाजारीपणामुळे ५२ जणांनी आणि आजारपणामुळे ४४ जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. याशिवाय लग्न न झाल्यामुळे २९, प्रेमभंगामुळे सात, मानसिक तणावामुळे सहा आणि परीक्षेच्या तणावामुळे सहा पुरुषांनी टोकाचे पाऊल उचलल्याची नोंद आहे.लग्न न होण्याचा प्रश्न काही तरुणांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करत असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये लग्नाच्या वयातील तरुणांना योग्य जोडीदार मिळण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जाते. मुलींची संख्या तुलनेने कमी असल्याने अनेक तरुणांचे विवाह रखडत आहेत. परिणामी, काही तरुणांमध्ये एकटेपणा, नैराश्य आणि मानसिक तणाव वाढत असल्याचे चित्र आहे.
 
 
लग्न होत नसल्यामुळे समाजाकडून होणारे टोमणे आणि नकारात्मक दृष्टिकोनही काही तरुणांच्या मानसिक स्थितीवर परिणाम करत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे. मात्र, आत्महत्येमागे केवळ एकच कारण नसते. वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक आणि मानसिक अशा अनेक घटकांचा त्यामागे प्रभाव असू शकतो, असेही तज्ज्ञ सांगतात.कुटुंबातील कमावत्या पुरुषाने आत्महत्या केल्यास त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. आर्थिक संकटासोबतच कुटुंबीयांना मोठ्या मानसिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या व्यक्तीशी कुटुंबीयांनी मोकळेपणाने संवाद साधणे, त्याच्या अडचणी समजून घेणे आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.