वर्धा,
gram-sabha-secret-voting : तालुक्यातील झाडगाव (गो.) ग्रामपंचायचे सरपंच भोजराज भागडे यांच्याविरुद्ध आज सोमवार २७ रोजी अविश्वास ठराव २४१ मतांनी पारित झाला. ठरावाच्या विरुद्ध १६५ नागरिकांनी मतदान केले. अविश्वास ठराव प्रक्रियेचा भाग म्हणून गुप्त मतदान घेण्यात आले होते.
झाडगाव (गो.) येथील सरपंच म्हणून भोजराज भागडे यांना तेथील मतदारांनी सन २०२२ मध्ये थेट निवडून दिले होते. पण, नंतर ते ग्रापं सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याचा आरोप करण्यात आले. इतकेच नव्हे तर १३ जुलै रोजी ग्रापंच्या मासिक सभेत सदस्यांनी त्यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव पारित केला होता. या घटनाक्रमाची माहिती जिल्हाधिकार्यांना देण्यात आली.
जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी वर्धा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांना विशेष ग्रामसभा घेत गुप्त मतदान घेण्याच्या सूचना दिल्या. आज सोमवार २७ रोजी झाडगाव (गो.) येथे विशेष ग्रामसभा व गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेत ४६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी दरम्यान ५६ मते अवैध ठरली. अविश्वासाच्या बाजूने २४१ मत पडल्याने अविश्वास ठराव पारित झाल्याचे गटविकास अधिकारी शेवाळे यांनी जाहीर केले.