ज्योतिर्मयी ‘इंडियन आयडल १६’ची विजेती!

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
मुंबई,
Jyotirmayi is the winner of Indian Idol 16 तब्बल नऊ महिन्यांच्या सुरेल प्रवासानंतर ‘इंडियन आयडल १६’ला अखेर नवी विजेती मिळाली आहे. ओदिशाची गायिका ज्योतिर्मयी नायक हिने आपल्या दमदार आणि भावपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर या लोकप्रिय गायन स्पर्धेची ट्रॉफी पटकावली. विजेतेपदासोबतच तिला २० लाख रुपयांचे रोख बक्षीसही मिळाले आहे. जबलपूरचा तनिष्क शुक्ला हा स्पर्धेचा प्रथम उपविजेता ठरला.ग्रँड फिनालेमध्ये ज्योतिर्मयीने ‘सैयां ओ सैयां’ हे गाणे अत्यंत भावपूर्ण पद्धतीने सादर केले. तिच्या आवाजातील भावनिक ताकदीने सभागृहातील वातावरण भारावून गेले आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिच्या कामगिरीचे कौतुक केले. यानंतर तिच्या नावाची विजेती म्हणून घोषणा करण्यात आली.या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात अंशिका चोनकर, मनराज वीर सिंह, मस्कम्मे बोसू, सुहेल सुफी आणि तनिष्क शुक्ला यांसारख्या प्रतिभावान गायकांशी ज्योतिर्मयीची चुरस होती. अखेर सर्वांना मागे टाकत तिने ‘इंडियन आयडल १६’च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.ज्योतिर्मयी नायकसाठी संगीत हा केवळ करिअरचा भाग नाही, तर समाजसेवेचेही माध्यम आहे. ‘इंडियन आयडल’मध्ये सहभागी होण्यापूर्वीपासूनच ती संगीत उपचाराच्या माध्यमातून कर्करोगग्रस्त रुग्णांना मदत करत आहे. तिच्या गायनासोबतच या सामाजिक कार्यामुळेही तिने अनेकांची मने जिंकली आहेत.
 
 
Jyotirmayi is the winner of Indian Idol 16
 
संपूर्ण स्पर्धेदरम्यान ज्योतिर्मयीने अनेक लक्षवेधी सादरीकरणे केली. ‘ओ जब तक है जान...’ हे गाणे तिने सादर केल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी उभे राहून तिचे कौतुक केले होते. ‘जाने क्यों लोग मोहब्बत किया करते हैं’ या गाण्याच्या सादरीकरणाने अभिनेत्री लीना चंदावरकरही प्रभावित झाल्या होत्या.‘यादों की प्लेलिस्ट’ या संकल्पनेवर आधारित ‘इंडियन आयडल १६’च्या संपूर्ण पर्वात जुन्या आणि सदाबहार गाण्यांना नव्या आवाजाची साथ मिळाली. ग्रँड फिनालेमध्ये परीक्षक श्रेया घोषाल आणि बादशाह यांच्यासह उषा उत्थुप, उदित नारायण, पापन, कुमार सानू, शहनाज गिल आणि उर्मिला मातोंडकर यांसारख्या दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती. विजेतेपद मिळाल्यानंतर ज्योतिर्मयी नायक भावूक झाली. हा क्षण आपल्या स्वप्नपूर्तीसारखा असल्याचे तिने सांगितले. ऑडिशनपासून ट्रॉफीपर्यंतचा प्रवास आयुष्य बदलणारा ठरल्याचे सांगत तिने आपल्या कुटुंबीयांसह चाहते, परीक्षक, कार्यक्रमाची संपूर्ण टीम आणि मतदान करून साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. ही ट्रॉफी केवळ आपली नसून, प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या आणि विश्वास ठेवणाऱ्या सर्वांची असल्याची भावना तिने व्यक्त केली. मेहनत, समर्पण आणि प्रतिभेच्या जोरावर स्वप्न साकार करता येते, हे ज्योतिर्मयी नायकच्या विजयाने पुन्हा सिद्ध झाले आहे.