उधार घेतलेल्या साडीतून ‘मिस वर्ल्ड’च्या मंचापर्यंत

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
मुंबई
kalpana iyer आजच्या काळात मॉडेलिंग आणि फॅशन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, काही दशकांपूर्वी या क्षेत्रात पाऊल ठेवणे तितके सोपे नव्हते. ९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी आणि फॅशन विश्वात आपल्या ग्लॅमरस अंदाजाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री आणि मॉडेल कल्पना अय्यर यांचा सुरुवातीचा प्रवासही अत्यंत संघर्षमय होता. एकेकाळी स्वतःची साडी खरेदी करण्यासाठीही पैसे नसलेल्या कल्पना अय्यर यांनी पुढे यशाच्या शिखरावर पोहोचत मोठी कामगिरी केली.
 

kalpana iyer struggle story from borrowed saree to miss world fame inspiring journey 
‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या कल्पना अय्यर यांनी नुकतेच इन्स्टाग्रामवर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत संघर्षाच्या दिवसांबद्दल भावनिक अनुभव शेअर केला आहे.आपल्या प्रवासाची सुरुवात आठवताना कल्पना अय्यर म्हणाल्या, "नोव्हेंबर १९७५ मध्ये मी ‘नेव्ही क्वीन ब्यूटी कॉन्टेस्ट’मध्ये भाग घेतला होता. त्यावेळी माझ्याकडे महागडे डिझायनर कपडे घेण्याची ऐपत नव्हती. मी एका मैत्रिणीकडून साडी, दुसऱ्या कुणाकडून ब्लाउज आणि पेटीकोट उधार मागून ही स्पर्धा गाठली होती. माझ्याकडे फक्त माझा आत्मविश्वास, डोळ्यांत काजळ, ओठांवर लिपस्टिक आणि कंबरेखाली येणारे लांबसडक केस होते."या सौंदर्य स्पर्धेत कल्पना अय्यर विजेतेपद पटकावू शकल्या नाहीत, मात्र त्या फर्स्ट रनर-अप ठरल्या. याच मंचावर त्यांची भेट अशा व्यक्तीशी झाली जिने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. त्या काळातील प्रसिद्ध मॉडेल टीना मुनीम एका मोठ्या फॅशन शोमधून अचानक बाहेर पडल्या आणि त्यांची जागा घेण्याची संधी कल्पना अय्यर यांना मिळाली.
 
 
अवघ्या एका आठवड्यात त्यांना दिल्लीतील एका मोठ्या फॅशन शोसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या करिअरने वेग घेतला. १९७६ मध्ये त्यांनी ‘मिस टीनेज इंटरकॉन्टिनेन्टल’ स्पर्धेत यश मिळवले. त्यानंतर १९७८ मध्ये त्यांनी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत टॉप १५ मध्ये स्थान पटकावले.१९७५ ते १९७९ हा काळ आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा असल्याचे सांगताना कल्पना अय्यर म्हणाल्या, "त्या काळात मी रात्रंदिवस काम केले. माझ्या मेहनतीने माझ्या कुटुंबाला आर्थिक स्थिरता दिली, आत्मविश्वास दिला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंद दिला."उधार घेतलेल्या साडीतून सुरू झालेला कल्पना अय्यर यांचा प्रवास मेहनत, आत्मविश्वास आणि जिद्दीचे उदाहरण ठरला आहे. संघर्षाच्या काळातून मार्ग काढत त्यांनी मॉडेलिंग, सौंदर्य स्पर्धा आणि चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.