सीसीटीएनएस प्रणालीत कपीलनगर ठाणे अव्वल !

- सदर-कळमना दुसऱ्या स्थानावर : पोलिस आयुक्तांनी केले कौतूक

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
kapilnagar police station cctns ऑनलाईन गुन्हे नोंदणी, तपास प्रक्रिया आणि पोलिस कामकाजाच्या डिजिटल व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम्स’ (सीसीटीएनएस) प्रणालीमध्ये नागपूर पोलिस आयुक्तालयातील कपीलनगर पोलिस ठाणे अव्वल स्थानावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, वेळेत माहिती अद्ययावत करणे आणि गुन्ह्यांच्या तपासातील कार्यक्षमता यामुळे कपीलनगर पोलिसांना हा मान मिळाला आहे. या वर्गवारीत सदर आणि कळमना पोलिस ठाणे दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर जरीपटका, पाचपावली आणि अजनी पोलिस ठाण्यांचा क्रमांक आहे.
सीसीटीएनएस ही महत्त्वाकांक्षी प्रणाली असून, देशातील सर्व पोलिस ठाण्यांना डिजिटल नेटवर्कद्वारे जोडण्याचे काम या माध्यमातून केले जाते. एफआयआर नोंदणी, तपासाची माहिती, आरोपींची नोंद, जप्ती, न्यायालयीन प्रक्रिया तसेच गुन्हेगारीशी संबंधित माहिती या प्रणालीत ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास अधिक जलद, पारदर्शक आणि प्रभावी होण्यास मदत होते.
 

kapilnagar police station cctns 
नागपूर शहर पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यांमधील गुन्ह्यांची माहिती वेळेत प्रणालीमध्ये अद्ययावत करणे, प्रकरणांच्या तपासाची नियमित नोंद, प्रलंबित कामांचा निपटारा आणि डिजिटल नोंदींची अचूकता राखण्यावर विशेष भर दिला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश आडे यांच्या सातत्यपूर्ण देखरेखीमुळे आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे कपीलनगर पोलिसांनी आयुक्तालयातील इतर पोलिस ठाण्यांना मागे टाकत प्रथम स्थान मिळविले आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कपीलनगर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल ठाणेदारासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत भविष्यातही ही गुणवत्ता कायम राखण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे सीसीटीएनएस?
सीसीटीएनएस ही देशपातळीवर विकसित केलेली प्रणाली आहे. त्यात देशपातळीवरील गुन्हे व गुन्हेगारांची माहिती उपलब्ध आहे. एखाद्या आरोपीची पडताळणी करायची असले तर त्या व्यक्तीविरुद्ध देशभरात कोठे, कोणता गुन्हा दाखल आहे का याची माहिती एका क्लिकवर मिळते. त्याद्वारे गुन्हे प्रकटीकरण, गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीप्रमाणे शोध, शस्त्र परवाना, तसेच तपासामध्ये गुन्ह्यांची सध्यस्थिती याविषयीची माहितीची सुविधा या प्रणालीमध्ये अद्यावत आहे.
सीसीटीएनएसमुळे नागरिकांना विविध पोलिस सेवा अधिक वेगाने उपलब्ध होण्यास मदत होणार असून, गुन्ह्यांच्या तपासात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अधिक मजबूत होईल. पोलीस तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण, गुन्ह्यांचे पर्यवेक्षण, गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी हा महत्वाचा टप्पा आहे.
- विश्वास नांगरे पाटील (पोलिस आयुक्त)