नागपूर,
katol-womens-battalion : राज्य राखीव पोलिस दलात म्हणजेच एसआरपीएफ काटोलमध्ये महिलांसाठी स्वतंत्र बटालियन स्थापन करण्याची ऐतिहासिक घोषणा करून तब्बल सहा वर्षे उलटली आहेत. मात्र अजूनपर्यंत एकाही महिला जवानाची भरती झालेली नाही. नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे पहिली महिला बटालियन स्थापन करण्यास सरकारची मंजुरी मिळाली असतानाही, भरती प्रक्रिया केवळ फायलींमध्ये अडकून पडली आहे. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यभरातील हजारो महिला उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे.
६ वर्षांपूर्वी काय झाले होते?
-७ जुलै २०२० रोजी तत्कालीन सरकारने एसआरपीएफमध्ये महिलांचा स्वतंत्र गट स्थापन करण्याची घोषणा केली.
-काटोल येथे पहिली महिला बटालियन स्थापन करण्याचा निर्णय झाला.
- बटालियनसाठी १३८४ पदांना शासनाची मंजुरी मिळाली.
- २०२१ च्या भरतीत ४६१ पदे पहिल्या टप्प्यात भरल्या जाणार होती, उर्वरित ३ टप्प्यांत. पण २०२६ आले तरी एकही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.
उमेदवार काय म्हणत आहेत?
पोलिस भरतीची तयारी करणारी विद्यार्थिनी काजल पवार म्हणाली, एसआरपीएफमधील महिलांची भरती ६ वर्षांपासून रखडली आहे. २०२० मध्येच जागांना मंजुरी मिळाली होती. शासनाकडून फक्त आश्वासने मिळत आहेत. आता लवकरच नवी पोलिस भरती जाहीर होणार आहे. किमान या भरतीत तरी सरकारने एसआरपीएफ महिला भरतीसाठी पात्रता आणि परीक्षेचे स्वरूप तातडीने जाहीर करावे, जेणेकरून आम्हाला तयारी करता येईल.
पोलिस भरतीची तयारी करणारी विद्यार्थिनी स्वाती शिंदे म्हणाली, सीआरपीएफ आणि लष्करात महिला उत्तम काम करीत आहेत. मग राज्याच्या एसआरपीएफमध्ये महिलांना संधी का दिली जात नाही? केवळ घोषणा न करता तातडीने निकष जाहीर करून भरती सुरू करावी. या दिरंगाईमुळे आमच्यासारख्या अनेक मुलींचे वयोमर्यादेचे नुकसान होत आहे.
प्रशासनाकडून फक्त आश्वासने
विद्यार्थी समन्वय समितीचे विठ्ठल बडे म्हणाले, २०२३ आणि २०२५ च्या विधिमंडळ अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी शासनाने लवकरच भरती सुरू करू, असे आश्वासन दिले होते. आम्ही गृह विभाग आणि पोलिस महासंचालक कार्यालयाला वारंवार ई-मेल आणि पत्रे दिली आहेत. पण अजूनही ठोस कार्यवाही नाही.
ऐतिहासिक भूमिका धोक्यात
देशात सर्वप्रथम महिला पोलिसांची नियुक्ती करणारे राज्य महाराष्ट्र आहे. केंद्राच्या सीआरपीएफमध्ये काही वर्षांपासून महिला जवान आहेत. त्याच धर्तीवर एसआरपीएफ चालते. परंतु राज्यात महिलांना सामावून घेण्यात प्रशासकीय उदासीनता दिसत आहे, असे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे.
आगामी पोलिस भरतीच्या जाहिरातीत एसआरपीएफ महिला बटालियनची १३८४ पदे समाविष्ट करावीत आणि काटोलमधील बटालियन प्रत्यक्षात सुरू करावी, अशी मागणी होत आहे.