हरारे,
Lakshman's advice to Vaibhav झिम्बाब्वेविरुद्धची टी-२० मालिका ३-० ने जिंकल्यानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचे तोंडभरून कौतुक केले. तीन सामन्यांच्या मालिकेत १५१ धावा करणाऱ्या वैभवच्या कामगिरीने लक्ष्मण प्रभावित झाले असून, भविष्यात हा युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्याचवेळी वैभवने आपल्या सर्वांगीण तंदुरुस्तीवर आणखी काम करण्याची गरज असल्याचेही लक्ष्मण यांनी स्पष्ट केले.मालिकेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना लक्ष्मण यांनी वैभवच्या खेळातील समर्पणाचे विशेष कौतुक केले. सीमारेषेजवळ झेल घेण्याच्या प्रयत्नात दुखापत झाल्यानंतरही वैभव मैदान सोडण्यास तयार नव्हता. फिजिओच्या आग्रहानंतरच त्याला मैदानाबाहेर जावे लागले. संघासाठी कोणत्याही परिस्थितीत योगदान देण्याची त्याची तयारी यावरून दिसून येते, असे लक्ष्मण म्हणाले.

वैभव अजून खूप तरुण आहे आणि त्याच्यात सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्याची तयारी आहे. गेल्या सहा महिन्यांत त्याच्या खेळाबाबतच्या समजुतीत मोठी प्रगती झाली आहे. त्यामुळे तंदुरुस्तीच्या बाबतीतही त्याने आणखी प्रगती करावी, अशी अपेक्षा लक्ष्मण यांनी व्यक्त केली.इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये वैभवची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. मात्र, त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध त्याने केलेले दमदार पुनरागमन लक्ष्मण यांच्यासाठी आश्चर्यकारक नव्हते. गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने दबावाचा सामना अत्यंत चांगल्या पद्धतीने केला होता. आयपीएलमधील सामनेही आंतरराष्ट्रीय सामन्यांइतकेच आव्हानात्मक असतात आणि इतक्या कमी वयात या पातळीवर खेळणे एखाद्या खेळाडूसाठी दबावाचे ठरू शकते किंवा तो त्याकडे आव्हान म्हणून पाहू शकतो, असे लक्ष्मण यांनी सांगितले. शतक झळकावता न आल्याने वैभव निराश झाला होता. मात्र, ही त्याची पहिली किंवा शेवटची संधी नाही, असे त्याला समजावून सांगण्यात आल्याचे लक्ष्मण यांनी सांगितले. वैभवसमोर मोठी कारकीर्द आहे आणि दररोज सुधारणा करण्याची त्याची वृत्ती ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. ‘मला खात्री आहे की वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडेल. त्याच्यात तशी क्षमता आणि संभाव्यता आहे,’ असा विश्वास व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी व्यक्त केला.