आनंदवार्ता! ५३३ शेतकऱ्यांच्या खात्यात महिनाअखेरीस रक्कम जमा होणार

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
मुंबई
maharashtra farmer loan पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या ५३३ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली असून, या शेतकऱ्यांच्या खात्यात या महिन्याच्या अखेरपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची कर्जखाती निरंक होतील आणि त्यांना नव्याने पीककर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
 

maharashtra farmer loan waiver update first list of 533 eligible farmers announced 
कर्जमाफी योजना किती टप्प्यांत राबवण्यात येणार आहे आणि ती कधीपर्यंत पूर्ण होईल, याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली. इंदापूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी कर्जमाफीच्या पुढील टप्प्यांची माहिती दिली.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, कर्जमाफीची प्रक्रिया तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. पहिला टप्पा सुरू झाला असून, पुणे जिल्ह्यासाठी सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना तीन टप्प्यांतून सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी एकाच वेळी होणार नसून, टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्येही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
 
 
कर्जमाफीची प्रक्रिया महिनाअखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य
 
 
कर्जमाफी प्रक्रियेबाबत नवीन वेळापत्रक देताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, पहिला टप्पा पूर्ण झाला असून, पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी ३० जून ही अंतिम मुदत सांगण्यात आली होती. त्यानंतर ५ जुलैची मुदतही पुढे गेली होती.अजित पवार यांच्या जयंती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ५३३ पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. मात्र, संपूर्ण कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असून, अंतिम टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.राज्यातील एकूण ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या २३.६३ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.या योजनेसाठी ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयकृत बँका आणि खासगी बँकांसह एकूण ५३ बँकांनी महाआयटी पोर्टलवर संबंधित माहिती अपलोड केली आहे.दरम्यान, इतर राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत दत्तात्रय भरणे म्हणाले की, हा वरिष्ठांचा निर्णय आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे निर्णय घेतला असेल, असे त्यांनी सांगितले.देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत विचारले असता, "याबाबत मी तुमच्याकडूनच ऐकतोय. माहिती घेतल्यानंतर बोलेन," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
इंदापूर येथे आयोजित आरोग्य शिबिराबाबत बोलताना त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आरोग्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. नगराध्यक्ष भरत शहा यांनी आयोजित केलेल्या या शिबिराचा तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना मोठा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.