मुंबई
heavy rainfall मोठ्या विश्रांतीनंतर राज्यभरात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, काही भागांमध्ये पावसाने रौद्र रूप धारण केले असून नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची नोंद होत आहे.
भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओराई, सिधी आणि रांची परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, कोल्हापूर घाटमाथा आणि गडचिरोली या भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.मराठवाड्यातही आज पावसाची हजेरी लागण्याची शक्यता असून, जवळपास सर्वच जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून, सकाळीदेखील संततधार कायम होती.
दरम्यान, राज्यात पुढील काही heavy rainfall दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशभरात मान्सून अधिक सक्रिय होत असून, भारतीय हवामान विभागाने पुढील १२ तासांसाठी १८ राज्यांना मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे.ताज्या अंदाजानुसार, २७ जुलै रोजी उत्तर भारतापासून पूर्व आणि मध्य भारतापर्यंत अनेक राज्यांमध्ये हवामानाची स्थिती तीव्र राहण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये ताशी ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या १८ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील काही तास नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा होणार असून, पाण्याअभावी अडचणीत आलेल्या शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे.