bombay karachi halwa बॉम्बे-कराची हलवा म्हटले की त्याचा चमकदार रंग, लवचिक पोत आणि तोंडात विरघळणारी चव अनेकांना आकर्षित करते. बाजारातील हलव्यासारखा परफेक्ट हलवा घरी बनवणे कठीण आहे, असे अनेकांना वाटते. मात्र, योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत वापरल्यास हा स्वादिष्ट हलवा घरच्या घरी सहज तयार करता येतो.
साहित्य:
अर्धा कप कॉर्नफ्लोअर, दीड कप साखर, २ कप पाणी, पाव कप साधे तूप, १ छोटा चमचा लिंबाचा रस, २ चिमूटभर खाद्यरंग, २ ते ३ मोठे चमचे बारीक चिरलेला सुका मेवा आणि अर्धा छोटा चमचा वेलची पूड.
कृती :
सर्वप्रथम अर्धा कप कॉर्नफ्लोअरमध्ये १ कप पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने मिश्रण तयार करावे. त्यानंतर जाड बुडाच्या भांड्यात दीड कप साखर आणि उरलेले १ कप पाणी घेऊन मध्यम आचेवर साखर पूर्णपणे विरघळू द्यावी. मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यात १ छोटा चमचा लिंबाचा रस घालावा.
यानंतर आच मंद करून कॉर्नफ्लोअरचे मिश्रण हळूहळू भांड्यात ओतावे आणि सतत ढवळत राहावे. काही वेळाने मिश्रण घट्ट व पारदर्शक होऊ लागेल. हलवा तळाला लागू नये यासाठी सतत ढवळणे महत्त्वाचे आहे.
मिश्रण घट्ट झाल्यानंतर तूप एकाच वेळी न घालता ४ ते ५ वेळा थोडे थोडे करून घालावे. प्रत्येक वेळी तूप पूर्णपणे मिसळल्यानंतरच पुढील भाग घालावा. यामुळे हलव्याला चमक आणि योग्य लवचिक पोत मिळतो.
यानंतर आवडीनुसार खाद्यरंग, वेलची पूड आणि बारीक चिरलेला सुका मेवा घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. हलवा कढईच्या कडा सोडून एकत्र येऊ लागला की गॅस बंद करावा. तुपाने चोपडलेल्या ताटलीत किंवा ट्रेमध्ये हे मिश्रण ओतून समान पसरवावे आणि वरून सुका मेवा घालावा.
हलवा खोलीच्या तापमानावर २ ते ३ तास ठेवल्यानंतर सेट होतो. त्यासाठी फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते. सेट झाल्यानंतर चाकूने त्याचे आवडीच्या आकाराचे तुकडे करता येतात.
हलवा बनवताना आच सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद ठेवणे, मिश्रण सतत ढवळत राहणे आणि तूप थोडे थोडे करून घालणे या तीन गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यामुळे हलवा तळाला चिकटत नाही आणि त्याचा पोतही मऊ, लवचिक व चविष्ट राहतो.