मानोरा,
manora taluka स्वातंत्र्योत्तर ७८ वर्षांनंतर आकांक्षीत तालुका म्हणून ओळखल्या जाणार्या मानोराचा अविकसितपणाचा डाग आता पुसला जाणार आहे. केंद्र सरकारचे दोन मोठे राष्ट्रीय प्रकल्प - यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वे मार्गिका आणि अकोला-आर्णी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए - तालुयातून जात असल्याने येथील दळणवळण आणि औद्योगिक विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
तालुयात नव्याने रेल्वे ट्रॅक टाकले जात असून, काँक्रिट स्लीपरवर रुळ बसवण्याचे काम सुरू आहे. बाजूला प्लॅटफॉर्मसाठी भिंत बांधण्यात आली आहे. कामासाठी जेसीबी मशीन उभी आहे आणि नव्या रेल्वेला पाहून आनंदाने हात उंचावणारी लहान मुले या प्रकल्पाबद्दलच्या अपेक्षा दर्शवतात. दक्षिण-उत्तर दिशेने जाणारी ही रेल्वे मार्गिका गादेगाव आणि अमरगड (वाईगोळ) या गावांच्या सीमांना स्पर्श करून जात आहे. अमरगड-वाई गौळ येथे नवीन रेल्वे स्टेशन उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. काही प्रमाणात रेल्वे ट्रॅक टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे. या मार्गामुळे तालुयातील शेतकरी, विद्यार्थी व भाविकांना थेट यवतमाळ, नांदेड, वाशीमशी जोड मिळणार आहे.
अकोला-आर्णी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए हा राष्ट्रीय महामार्ग जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या महामार्गामुळे मानोरा ते अकोला आणि आर्णी पर्यंतचा प्रवास वेगवान झालेला असून, मालवाहतुकीलाही चालना मिळत आहे. कच्चा माल आणि तयार मालाची वाहतूक स्वस्त होणार. लघु व मध्यम उद्योगांना चालना. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकर्यांना मोठ्या बाजारपेठा जवळ येणार. रेल्वे स्टेशन, महामार्गालगत लॉज, हॉटेल, पेट्रोल पंप व इतर व्यवसाय उभे राहणार. विद्यार्थी व रुग्णांना मोठ्या शहरांपर्यंत जलद पोहोचता येणार आहे.
तालुका वर्षानुवर्षे दळणवळणापासून वंचित होता. आता रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गामुळे मानोराचा नकाशावर ठळक ठसा उमटणार आहे. आमच्या मुलांना आता नोकरी-व्यवसायासाठी मोठ्या शहरात भटकावे लागणार नाही, अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली. ७८ वर्षांनंतर मिळालेल्या या दोन राष्ट्रीय प्रकल्पांमुळे मानोरा तालुयाच्या विकासाला नवसंजीवनी मिळाली असून, येणार्या काळात तालुयाचे चित्र पूर्णपणे बदलणार असल्याचे हे शुभ संकेत आहेत.