'भूकंप' एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटीचा दावा खोटा?

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
मुंबई
mpsc महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपांमुळे काही दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती. परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधी प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून, औषध निरीक्षक पदाची प्रश्नपत्रिका फुटलीच नसल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पेपर फुटल्याची तक्रार एका बनावट ई-मेलच्या आधारे करण्यात आली होती. व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात खोटी तक्रार करणाऱ्यांवर एमपीएससी कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.
 

fhu 
या प्रकरणात गौरव पाटील आणि लोकेश पाटील यांनी एमपीएससीला ई-मेल पाठवून ही तक्रार चुकीची असल्याचे स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी काल रात्री पाठवलेल्या मेलमध्ये प्रश्नपत्रिका फुटीच्या आरोपांचा परीक्षेशी कोणताही संबंध नसल्याचे नमूद केले आहे. व्हॉट्सअॅपवर फिरणारी प्रश्नपत्रिका ही स्थानिक स्तरावरील परीक्षेची किंवा टेस्ट सिरीजची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
 
या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेचा पेपर २० मार्च २०२६ रोजी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आला होता. यासंदर्भात गौरव पाटील, लोकेश पाटील आणि ऋषीकेश गांगर्डे यांनी तक्रार केली होती. मात्र, तपास केल्यानंतर व्हॉट्सअॅपवर प्रसारित झालेली तथाकथित प्रश्नपत्रिका ही आयोगाच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी पूर्णपणे वेगळी असल्याचे निदर्शनास आले.ई-मेलनुसार, आयोगाची मूळ प्रश्नपत्रिका कोणत्याही परिस्थितीत फुटलेली नव्हती. ऋतूजा आणि संबंधित व्यक्तींमध्ये झालेल्या संभाषणात विनोद म्हणून ती आयोगाची प्रश्नपत्रिका असल्याचे म्हटले गेले होते. मात्र, प्रत्यक्षात ऋतूजाला मिळालेली प्रश्नपत्रिका आयोगाची नसून एका टेस्ट सिरीजची प्रश्नपत्रिका होती. आयोगाची बदनामी करण्याचा कोणताही हेतू नसल्याचेही ई-मेलमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, ऋषीकेश गांगर्डे यांनी या प्रकाराचा वेगळा अर्थ लावत प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयोगाची २२ मार्च रोजी परीक्षा झाल्यानंतर संबंधित प्रश्न टाईप करून तीच प्रश्नपत्रिका २० मार्च रोजी पाठवण्यात आली होती, अशी अफवा पसरवण्यात आल्याचेही ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.
 
 
ऋषीकेश गांगर्डे स्वतः परीक्षा उत्तीर्ण झाले नसून, भविष्यात औषध निरीक्षक पदाची जाहिरात लवकर निघणार नसल्याच्या कारणातून पुन्हा परीक्षा घेण्यात यावी यासाठी पेपर फुटीची अफवा पसरवण्यात आल्याचा आरोपही या ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. तसेच एमपीएससी आयोग, आयोगाचे सचिव आणि अध्यक्ष यांच्याविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे गौरव पाटील आणि लोकेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.या सर्व घडामोडींनंतर एमपीएससी पेपर फुटीच्या कथित प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून, आता खोटी तक्रार आणि गैरसमज पसरवणाऱ्यांवर आयोग कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.