एमपीएससीच्या 'औषध’ परीक्षेत पेपरफुटीचा डोस?

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
मुंबई,
MPSC exam paper leak देशभरात चर्चेत आलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोन उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. तक्रारदारांच्या दाव्यानुसार, 22 मार्च 2026 रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सअॅपवर प्रसारित झाली होती. याशिवाय काही उमेदवारांच्या गुणांमध्ये संशयास्पद वाढ झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. गुणपत्रिका आणि अंतिम निवड यामध्ये विसंगती असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
 
 
MPSC exam paper leak
 
या प्रकरणातील व्हॉट्सअॅप संभाषणे, कॉल रेकॉर्ड आणि अन्य डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून गैरप्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही तक्रारदारांनी म्हटले आहे.दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. औषध निरीक्षक भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून, प्राप्त तक्रारीतील तथ्यांची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
 
 
 
 
या प्रकरणावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनीही एक्सवर पोस्ट करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. औषध निरीक्षक परीक्षा हा केवळ एका प्रश्नपत्रिकेचा विषय नसून, हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परीक्षेपूर्वी काही उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा प्रकार समोर येत असल्याचा दावा करत, हा आरोप खरा ठरल्यास संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाला धक्का बसेल, असे शेख यांनी नमूद केले.एका प्रश्नपत्रिकेमागे हजारो विद्यार्थ्यांची अनेक वर्षांची मेहनत, पालकांचे कष्ट आणि त्याग असतो. काही मोजक्या व्यक्तींच्या गैरप्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक राहावी आणि एमपीएससीवरील जनतेचा विश्वास कायम राहावा, यासाठी असल्याचे शेख यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगत, उपलब्ध माहिती आणि पुरावे संबंधित यंत्रणेकडे सादर करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दोषी कोणताही असो, त्याला राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण न देता कठोर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थी सहानुभूती नव्हे, तर आपल्या मेहनतीला न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा करत आहेत. एमपीएससीवरील विश्वास टिकवायचा असेल, तर या प्रकरणातील सत्य समोर आलेच पाहिजे, अशी मागणी महेबुब शेख यांनी केली आहे.