मुंबई
mumbai byculla police station मुंबईतून एक मोठी घटना समोर आली आहे. भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळांचे व्हिडिओ समोर आले असून, त्यामध्ये आगीची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत पोलीस ठाण्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने कारवाई करत आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील जाणून घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
कल्याणमध्ये चालत्या दुचाकीला आग
कल्याण पश्चिमेतील कोळीवली पेट्रोल पंपाजवळ चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. दुचाकीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून तातडीने बाहेर उडी मारली.
काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
भिवंडीत टेम्पोला भीषण आग
भिवंडी तालुक्यातील वडपे वंजारपट्टी नाका रस्त्यावरील निंबवली फाटाजवळ उभ्या असलेल्या टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना घडली. नाशिकहून भिवंडीतील पोगाव येथील ॲमेझॉन गोदामात किराणा साहित्य घेऊन येणाऱ्या या टेम्पोला आग लागली.मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक सद्दाम हुसेन हा रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून चहा पिण्यासाठी खाली उतरला होता. त्याच वेळी टेम्पोला आग लागली. स्थानिक नागरिकांनी पाण्याच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.काही वेळातच संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.