तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
murder : प्रेमसंबंधाच्या संशयातून झालेल्या खूनप्रकरणात दोषी ठरलेल्या आरोपी श्याम सुभाष जोगदंड याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यावलकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लोहारा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणात नेताजीनगर, यवतमाळ येथील श्याम सुभाष जोगदंड (वय 28) याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 302, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या 2 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी सुमारे 7 ते 7.50 च्या दरम्यान प्रेमसंबंधाच्या संशयातून आरोपीने रंभाजीनगर परिसरात हेमंत कांबळे याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हेमंत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास ठाणेदार यशोधरा मुनेश्वर यांनी केला. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे 10 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, डॉक्टर, तक्रारदार, तपास अधिकारी तसेच इतर पुरावे व दस्तऐवजांच्या आधारे न्यायालयाने हा गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद केले. त्यामुळे न्यायमूर्तींनी आरोपीस जन्मठेप (आजीवन सश्रम कारावास) व 2 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सहाय्यक सरकारी अॅड. नरेंद्र पांडे यांनी काम पाहिले असून तपास अधिकारी यशोदा मुनेश्वर तसेच सहायक पोलिस उपनिरीक्षक जगदीश भगत यांनी सहकार्य केले आहे.