मी न्यूयॉर्कला येणारच!

नेतान्याहूंचा ममदानींना थेट इशारा

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
तेल अवीव,
Netanyahu's direct warning to Mamdani न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करण्यासाठी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कला जाणार असल्याचे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले असून, याच पार्श्वभूमीवर त्यांनी ममदानी यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.ममदानी यांनी यापूर्वी नेतान्याहू यांना युद्ध गुन्हेगार संबोधत न्यूयॉर्कमध्ये त्यांचे स्वागत केले जाणार नसल्याचे म्हटले होते. इतकेच नव्हे, तर नेतान्याहू शहरात आल्यास त्यांना अटक करण्याच्या शक्यतेवरही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांनी ममदानींना थेट प्रत्युत्तर दिले.
 
 

rt567
 
‘ज्यू लोकांच्या सत्यासाठी आणि इस्रायलच्या भूमिकेसाठी आवाज उठवण्यासाठी मी न्यूयॉर्कला जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून इस्रायल आणि इस्रायल-अमेरिका युतीच्या समर्थनार्थ बोलणे हा माझा उद्देश आहे,’ असे नेतान्याहू यांनी एका मुलाखतीत सांगितले.यावेळी त्यांनी ममदानी यांच्यावर हमासला पाठिंबा देत असल्याचा गंभीर आरोप केला. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायली नागरिकांवर झालेल्या हल्ल्याबाबत ममदानी यांची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा नेतान्याहू यांनी केला. हमासच्या हल्ल्यात २५१ जणांना ओलीस ठेवण्यात आल्याचे सांगत नेतान्याहू यांनी ममदानी यांच्यावर जोरदार टीका केली.
 
 
दरम्यान, जुलैच्या सुरुवातीला ममदानी यांनी नेतान्याहू न्यूयॉर्कमध्ये आल्यास त्यांच्याविरोधातील अटक वॉरंटची अंमलबजावणी करता येईल का, याबाबत न्याय विभागाशी चर्चा सुरू असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यावर इस्रायलने तीव्र आक्षेप घेतला होता. अमेरिकेतील सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांनीही ममदानी यांच्या भूमिकेवर टीका केली. यानंतर ममदानी यांनी आपल्या वक्तव्यावर काही प्रमाणात स्पष्टीकरण दिले. अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याचा स्वतंत्र कायदेशीर अधिकार न्यूयॉर्क शहराकडे नसल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, संघीय सरकारकडे हा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी अमेरिकेला आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने नेतान्याहू यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. याच मुद्द्यावरून न्यूयॉर्कमध्ये निर्माण झालेल्या वादात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नेतान्याहू यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. अमेरिकेत असताना नेतान्याहू यांना कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाणार नाही, असे ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले.