नीरव मोदी ब्रिटनमध्येच असल्याचे पाहून संताप

खासदार प्रीती पटेल संतप्त

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
लंडन,
nirav modi is in britain न्यायालयात प्राथमिक पुरावे सिद्ध झाल्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये गृहमंत्री म्हणून नीरव मोदीच्या भारताकडे प्रत्यार्पणाच्या आदेशावर स्वाक्षरी करणाऱ्या ब्रिटिश-भारतीय मंत्री प्रीती पटेल यांनी, तो अजूनही ब्रिटनमध्येच असल्याचे पाहून आपल्याला धक्का बसला असून, आपण अत्यंत अस्वस्थ झालो आहोत, असे म्हटले आहे. देशातील सर्वांत मोठ्या बँक घोटाळ्यांपैकी एका प्रकरणात हवा असलेल्या आणि हिरे-दागिने व्यवसायाशी संबंधित असलेल्या व्यक्तीचे प्रत्यार्पण करण्यात ब्रिटनला आलेल्या अपयशामुळे भारतीय अधिकारी अत्यंत संतापलेले होते, असे कॉन्झर्व्हेटिव्ह विरोधी पक्षातील पर्यायी परराष्ट्र मंत्री असलेल्या पटेल यांनी ‘द डेली टेलिग्राफ’च्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ही मुलाखत पुढील आठवड्यात प्रसारित होणार आहे.
 
nirav modi is in britain
  
‘द डायमंड किंग’ या चार भागांच्या पॉडकास्ट मालिकेत लंडनमधील एका आलिशान फ्लॅटमध्ये लपून बसलेल्या नीरव मोदीचा शोध वृत्तपत्राने कसा लावला आणि त्यानंतर मार्च २०१९ मध्ये स्कॉटलंड यार्डने त्याला कशी अटक केली, याचा प्रवास मांडलेला आहे. केवळ प्रक्रिया आणि सबबींमध्ये अडकून न पडता आपली यंत्रणा जर विवेकी असती आणि योग्य ती कृती करत असती, तर तो या देशात नसता, असे पटेल यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. तो अजूनही इथे आहे, या गोष्टीमुळे मला खरोखरच धक्का बसला आहे आणि मला असे वाटते की, यामुळे आमच्यासोबत काम करण्याबाबत भारत सरकारचा उत्साह नक्कीच कमी होत असावा, असे त्या म्हणाल्या.
 
प्रत्यार्पण निश्चित
पंजाब नॅशनल बँकेची दोन अब्ज डॉलर्सची फसवणूक आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात नीरव मोदी लंडनच्या तुरुंगात आहे. युनायटेड किंगडममधील त्याचे कायदेशीर पर्याय संपले आहेत आणि फ्रान्समधील ‘युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राइट्स’मधील त्याची शेवटची याचिकाही फेटाळण्यात आली. त्यामुळे त्याचे भारतात प्रत्यार्पण आता निश्चित मानले जात आहे.