प्रशासकीय अनास्थेचा ‘चिखल..’ !

-अखेर नागरिकाने स्वखर्चाने बुजवला बसस्थानकातील खड्डा -पांढरकवडा एसटी डेपो गाढ झोपेत

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पारवा, 
pandharkawada-st-depot : यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा हे आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या परिसरातील सुमारे 42 गावांचे मुख्य दळणवळणाचे केंद्र असलेल्या पारवा येथील एसटी बसस्थानकाला सध्या भीषण अवकळा आली आहे. पावसाळ्यामुळे संपूर्ण स्थानक परिसरात चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य असून शुक्रवार, 24 जुलै रोजी एका बसचे चाक चिखलात रुतल्याने प्रवासी व शाळकरी विद्यार्थ्यांना गाडीला चिखलातून धक्का मारावा लागला होता.
 
 
 
y27July-Chikhal
 
 
 
या धक्कादायक घटनेनंतरही पांढरकवडा आगार आणि परिवहन खात्याला जाग आली नाही. अखेर कोणतीही जीवहानी किंवा मोठा अपघात होऊ नये, या सामाजिक भावनेतून पारवा येथीलच एका 77 वर्षीय ज्येष्ठ सुजाण नागरिकाने स्वतःचे पैसे खर्च करून विटांचा चुरा, राडा, रोडा आणला आणि बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील धोकादायक खड्डा बुजवला. वयाच्या ज्या टप्प्यात पूर्ण विश्रांंती घ्यायची, त्या वयात या आजोबांनी केलेल्या कामामुळे शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. शाळकरी मुले व प्रवाशांची होणारी दैना पाहून पाझरला विठ्ठल..!
 
 
पारवा हे परिसरातील 40-42 गावांचे मुख्य केंद्र असल्याने येथे दररोज शेकडो गरीब, आदिवासी शाळकरी विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते. येथून मांडवी-दारव्हा, यवतमाळ-आदिलाबाद, रामटेक-किनवट अशा अनेक लांब पल्ल्याच्या बसेस धावतात. प्रसिद्ध टिपेश्वर अभयारण्याकडे जाणारे पर्यटकही याच मार्गाचा वापर करतात. मात्र, मुख्य द्वारासमोरच तळ्याचे स्वरूप आल्याने चालकांना बसेस आत नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परवा बस अडकल्याने शाळकरी मुलांना चिखलात उतरून बसला धक्का द्यावा लागला, ज्यामुळे त्यांचे कपडे माखून शाळा बुडण्याची वेळ आली.
 
 
पारव्याच्या नागोराव येन्नरवार या 77 वर्षीय वृद्धाला ही रोजची दैना पाहावली नाही आणि त्यांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेतला. स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून आणला विटांचा चुरा आणि बुजवून घेतला खड्डा..! एसटी महामंडळ, पांढरकवडा डेपो आणि लोकप्रतिनिधी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने, या ज्येष्ठ नागरिकाने स्वतः उभे राहून मुख्य प्रवेशद्वारासमोरील त्या जीवघेण्या खड्ड्यात हा विटांचा चुरा टाकून रस्ता रहदारीसाठी योग्य केला.
 
 
याबाबत प्रतिक्रिया देताना नागोराव संतप्त सुरात म्हणाले, शाळकरी पोरांना आणि प्रवाशांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. बसेस नादुरुस्त होऊन मुलं वेळेवर शाळेत पोहोचत नाहीत. बसला धक्का मारताना गरीब पोरांचे कपडे चिखलाने माखतात. उद्या इथे एखादी जीवितहानी झाली किंवा मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण..?
 
 
कोणाचा तरी जीव जाण्यापेक्षा मी स्वतःचे पैसे खर्च करून मी हे काम केले. प्रशासनाला याची लाज वाटली पाहिजे. एका वृद्धाची संवेदनशीलता, लाखो रुपयांचा निधी हातात असलेल्या पांढरकवडा डेपो अधिकारी आणि परिवहन विभागाला का समजली नाही, असा संतप्त सवाल आता संपूर्ण तालुक्यातून विचारला जात आहे.