नवी दिल्ली,
Rain wreaks havoc across the country देशाच्या अनेक भागांत मान्सूनने रौद्र रूप धारण केले असून, गुजरात आणि आसामसह विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने आज १४ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, काही भागांमध्ये पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.छत्तीसगड, ओडिशा, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. ईशान्य भारतातही मान्सून सक्रिय राहणार असून, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आसाममध्ये पूरस्थितीने गंभीर वळण घेतले आहे. राज्यातील चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, नागाव आणि शिवसागर या पाच जिल्ह्यांतील ७६३ गावांना पुराचा फटका बसला असून, ५ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत. पाऊस आणि पुरामुळे राज्यात आतापर्यंत ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागांमध्ये घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागत आहे.
लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल यांच्याशी संवाद साधून आसाममधील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.गुजरातमध्येही मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या विक्रमी पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले असून, २० वर्षांचा पावसाचा विक्रम मोडला आहे. भवला आणि संथाल क्रॉस रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अहमदाबाद-राजकोट महामार्गावर दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गॅलॉप्स इंडस्ट्रियल पार्कमध्ये अडकलेल्या ९०० हून अधिक कामगारांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, तटरक्षक दल आणि लष्कराची मदत घेण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्येही मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले आहे. डोडा परिसरात चिनाब नदीला पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. दुसरीकडे, बनिहालच्या रामसू ब्लॉकमधील गंगरू भागात मोठे भूस्खलन झाल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ढिगारा हटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. सहा दिवसांच्या मुसळधार पावसानंतर काही भागांत हवामान निवळले असले तरी नद्या, ओढे आणि धरणांमधील पाण्याची पातळी अद्याप वाढलेली आहे.
उत्तर प्रदेशातही पर्वतीय भागातील पावसाचा परिणाम नद्यांच्या पाणीपातळीवर झाला आहे. गंगा आणि यमुनेसह १० नद्यांची पातळी वेगाने वाढत असून, घाघरा आणि शारदेसह चार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. बलियामध्ये नदीच्या प्रवाहामुळे एका घराचा पाया वाहून गेल्याने ते कोसळले. सरयू नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे बाराबंकी, सीतापूर, पिलीभीत आणि बहराइचमधील अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बाराबंकीमध्ये शारदा आणि गिरजा धरणांतून २,४४,००० क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने सरयू नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ झाली आहे. दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि बचाव यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य वेगाने सुरू असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.