ग्लासगो,
Raja Muthupandi's silver leap गंभीर दुखापतीनंतर दमदार पुनरागमन करणाऱ्या भारताच्या राजा मुथुपांडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये वेटलिफ्टिंगच्या ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. २६ वर्षीय मुथुपांडीने स्नॅचमध्ये १२६ किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो वजन उचलत एकूण २८६ किलो वजनाची नोंद केली आणि दुसरे स्थान मिळवले. या स्पर्धेत मलेशियाच्या अझनील बिन बिदिन मोहम्मदने २९९ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील त्याचे हे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले आहे.मुथुपांडीने स्नॅच फेरीत दुसऱ्या प्रयत्नात १२६ किलो वजन उचलत आपली दावेदारी मजबूत केली. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो वजन उचलून त्याने एकूण २८६ किलो वजनाची नोंद केली. या कामगिरीमुळे भारताच्या पदकतालिकेत आणखी एका पदकाची भर पडली.
राजा मुथुपांडीसाठी हे यश विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. २०१९ मध्ये कोपराला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याची कारकीर्द धोक्यात आली होती. या दुखापतीमुळे तो २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र, ६५ किलो वजनी गटाचा समावेश झाल्यानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करण्यास सुरुवात केली.२०२५च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मुथुपांडीने एकूण २९९ किलो वजन उचलत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. त्या स्पर्धेत त्याला नववे स्थान मिळाले होते. आता राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकामुळे त्याच्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब झाले आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत तीन पदके जिंकली. त्याआधी ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानूने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात सलग तिसरे सुवर्णपदक जिंकले, तर चानंबम ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी झंडू कुमारने पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकले होते. मुथुपांडीच्या रौप्यपदकानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या पदकांची संख्या चार झाली आहे. भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदके जिंकली आहेत. पदकतालिकेत भारत सातव्या स्थानावर पोहोचला असून, १२ सुवर्णपदकांसह एकूण २४ पदकांची कमाई करणारा ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर कायम आहे.