नागपूर,
saraswati puja तुळशीबाग, महाल येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्रात मातृ-पितृ पूजन आणि सरस्वती पूजन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी हजारो पालक आपल्या पाल्यांसह उपस्थित होते. आई-वडील हे प्रत्येक व्यक्तीचे पहिले गुरु असतात. त्यांनी आपल्याला बोलायला, चालायला शिकवले असून आजही ते आपल्या मुलांसाठी सदैव कष्ट घेत असतात. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला केंद्रात मातृ-पितृ पाद्यपूजन, श्री गुरुपूजन आणि सरस्वती संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या सोहळ्यात हजारो बालकांनी सहभागी होऊन आपल्या आई-वडिलांप्रती तसेच गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. श्रीनिवास सौदागर यांच्या हस्ते गणेशपूजन आणि सरस्वती पूजन मंत्रोच्चाराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिवज्ञा मते, तविष सेलोकर, स्मित कावळे, देव इंगळे आणि देवांश गायकवाड आदी बालसेवेकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. बालसंस्कार विभागाचे प्रतिनिधी आणि स्वामी सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. केंद्रात दर रविवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत बालसंस्कार वर्ग घेण्यात येतात. मुलांच्या बौद्धिक विकासासोबतच आध्यात्मिक संस्कार घडविण्यासाठी विविध उपक्रम, पारंपरिक खेळ तसेच स्तोत्र व मंत्रोच्चाराचे प्रशिक्षण दिले जाते. स्वामी सेवा मार्गाच्या १८ विविध विभागांतर्गत असे उपक्रम राबविले जातात.
सौजन्य: श्रीकांत तपासे, संपर्क मित्र