कथाकथनाने महाराष्ट्राला भुरळ घालणारे शंकर पाटील यांचे निवासस्थान

कलाकारांच्या घरांच्या आठवणी

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
प्रगती करंबेळकर
पुणे
 
पुण्याला कलाकारांची एक समृद्ध परंपरा लाभली असून साहित्य, नृत्य, संगीत, अभिनय सर्वच क्षेत्रातील दिग्गजांचा सहवास पुणे शहराला लाभला त्यांची वास्तू, घर अजूनही शहराच्या कोपऱ्याकोपऱ्यात आहेत. या वास्तू सर्जनशीलतेच्या, कलेच्या आणि इतिहासाच्या साक्षीदार असून या वास्तूंनी त्या कलाकाराचे चांगले-वाईट दिवस पाहिले आहे. त्यांच्या या आठवणींना उजाळा देण्यासाठी कलाकारांच्या जुन्या घराची गोष्ट हे सदर.
 
 
 

shankar patil, shankar patil residence pune, marathi storyteller shankar patil, shankar patil biography, marathi literature, kathakathan tradition, pune artist homes, journalist nagar pune, marathi writers, shankar patil stories, marathi sahitya, vyankatesh madgulkar, d ma mirasdar, marathi literature history, shankar patil birth centenary, old pune heritage homes
पुण्यातील पत्रकारांसाठी स्वतंत्र वसाहत असावी, या उद्देशाने १९६६ मध्ये पत्रकारनगरची स्थापना झाली. पुढे या परिसरात पत्रकार, साहित्यिक, कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे वास्तव्य झाले. डॉ. अनिल अवचट, मुक्ता पुणतांबेकर यांच्यासह शंकर पाटील यांचेही या परिसराशी जिव्हाळ्याचे नाते आहे. पत्रकारनगरच्या शांत, हिरवाईने नटलेल्या परिसरात आजही एका घराच्या पाटीवर लीला शंकर पाटील हे नाव दिसते. या घराने मराठी साहित्यविश्वातील एका महत्त्वाच्या लेखकाचा, कथाकथनकाराचा आणि संवेदनशील माणसाचा सर्जनशील प्रवास जवळून पाहिला आहे. सोप्या शब्दांतून ग्रामीण जीवनातील माणुसकी, नातेसंबंध, विनोद आणि भावभावना रसिकांपर्यंत पोहोचविणारे कथाकथनकार शंकर पाटील यांचे हे निवासस्थान. यावर्षी शंकर याचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे शंकर पाटील यांच्या कथांमध्ये ग्रामीण महाराष्ट्राचा गंध होता. गावाकडची माणसे, त्यांचे स्वभाव, नात्यांमधील गुंतागुंत, दैनंदिन जीवनातील गंमती आणि भावनिक प्रसंग त्यांनी अतिशय सहजपणे शब्दबद्ध केले. त्यांच्या कथा ऐकताना श्रोत्यांना स्वतःच्या गावाची, माणसांची आणि जगण्याची आठवण होत असे. म्हणूनच त्यांचे कथाकथन रसिकांसाठी एक अनुभव ठरत असे. आजही रसिक त्यांच्या कथाकथनांची अविस्मरणीय आठवण सांगतात.
 
 
 
व्यंकटेश माडगूळकर,shankar patil  द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील या त्रयीने महाराष्ट्रात कथाकथनाची एक वेगळीच परंपरा निर्माण केली. त्यांच्या कार्यक्रमांना शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत मोठी गर्दी होत असे. आजच्या स्टँडअप कॉमेडीला मिळणारी लोकप्रियता जशी मोठी आहे, तशीच, किंबहुना त्याहून अधिक लोकप्रियता या कथाकथनाच्या कार्यक्रमांना मिळत होती. तिघांच्या शैली वेगळ्या असल्या तरी त्यांच्यातील विनोद, निरीक्षणशक्ती आणि कथनकौशल्यामुळे श्रोते मंत्रमुग्ध होत.कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण-कोडोली येथे जन्मलेल्या शंकर पाटील यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अध्यापन क्षेत्रात काम केले. १९५७ मध्ये पुणे आकाशवाणी केंद्राशी त्यांचे नाते जोडले आणि पुणे त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनले. पुढे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात त्यांनी मराठी विषयाचे विशेष अधिकारी म्हणून काम केले.त्यांचे कथालेखन १९४९ पासून सुरू झाले. पुढील काळात त्यांनी १८ कथासंग्रह, दोन कादंबऱ्या, चित्रपटांच्या कथा-संवादलेखनासह विपुल साहित्यनिर्मिती केली. वळीव, टारफुला, फक्कड गोष्टी, शांकर कथा, गारवेल यांसारख्या कथासंग्रहांनी त्यांचे लेखन वाचकांपर्यंत पोहोचवले. एक गाव बारा भानगडी, युगे युगे मी वाट पाहिली, कुलस्वामिनी अंबाबाई यांसारख्या चित्रपटांमधूनही त्यांच्या लेखनाची छाप उमटली. कथा अकलेच्या कांद्याची आणि लवंगी मिरची कोल्हापूरची या वगनाट्यांनी त्यांची लोकप्रियता अधिक वाढवली.
 
 
१९८५ मध्ये नांदेड येथे झालेल्या ५९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शंकर पाटील यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी मराठी भाषेच्या भवितव्याचा गंभीर विचार मांडला. मराठी ही केवळ व्यवहाराची भाषा न राहता ज्ञान, विज्ञान, शिक्षण आणि संशोधनाची भाषा व्हावी, यासाठी स्वतंत्र मराठी विद्यापीठाची गरज त्यांनी अधोरेखित केली. मातृभाषेतून सर्वांना समान शिक्षण मिळाले पाहिजे, असा त्यांचा ठाम आग्रह होता.
 
 
घर आता पुनर्विकासाच्या प्रक्रियेत जाणार
पत्रकारनगरमधील शंकर पाटील यांचे घर आता पुनर्विकासाच्या प्रक्रियेत जाणार आहे. त्यामुळे या वास्तूच्या आठवणीही हळूहळू काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत. ज्या घरात कधीकाळी कथांचा आवाज घुमत असे, ग्रामीण माणसांच्या गोष्टी रंगत असत आणि मराठी भाषेच्या भवितव्यावर चर्चा होत असे, त्या घराभोवतालचा परिसर आज शांत झाला आहे. शंकर पाटील यांच्या कथांतील माणसे, त्यांचे अनुभव आणि मराठी भाषेविषयीचा त्यांचा विचार केवळ या परिसरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कायम राहिला आहे.