अवघ्या 18 दिवसांत पुसद मतदारसंघात एसआयआर डिजिटल नोंदणी 66 टक्के पूर्ण

उर्वरित 12 दिवसांत 100 टक्के नोंदणीसाठी यंत्रणा सज्ज

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
sir-digital-registration : राज्य निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार पुनरीक्षण (एसआयआर) अभियानांतर्गत सुरू असलेल्या डिजीटल नोंदणी मोहिमेला पुसद विधानसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत असून अवघ्या 18 दिवसांत तब्बल 66 टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित 12 दिवसांत जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी शुक्रवार 17 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
 
 
 
sir
 
 
 
पुसद विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 23 हजार 657 मतदार आहेत. त्यापैकी 2 लाख 81 हजार 495 एसआयआर अर्जांचे वितरण करण्यात आले असून आतापर्यंत 2 लाख 13 हजार 883 अर्ज भरून प्राप्त झाले आहेत. या सर्व अर्जांची डिजिटल डेटा एंट्री पूर्ण करण्यात आली आहे. नोंदणीच्या बाबतीत यवतमाळ जिल्हा राज्यात आघाडीवर असून पुसद मतदारसंघानेही या मोहिमेत उल्लेखनीय गती घेतल्याचे बिजवल यांनी सांगितले.
 
 
ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर नोंदणीचे प्रमाण समाधानकारक असले, तरी पुसद शहरातील 60 मतदान केंद्रे आणि श्रीरामपूर परिसरातील 9 मतदान केंद्रांवर नोंदणीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. या केंद्रांवरील कामाला गती देण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाèयांच्या बैठका घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
नोंदणी मोहिमेला अधिक वेग देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष शिबिरांना चांगला प्रतिसाद असून येत्या रविवारी मतदारसंघातील 343 मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. मतदारांनी या संधीचा लाभ घेऊन आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
 
 
सध्या सुमारे सव्वा लाख मतदारांची नोंदणी अद्याप बाकी असून, ती पुढील 12 दिवसांत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असल्याचे बिजवल यांनी नमूद केले.
 
 
या मोहिमेसाठी 343 बीएलओ, 35 पर्यवेक्षक, 13 एईआरओ यांच्यासह प्रत्येक बीएलओला सहाय्यक नियुक्त करण्यात आला आहे. बाहेरगावी असलेल्या मतदारांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असून, कोणतीही अडचण आल्यास तहसील कार्यालयातील मतदार सहाय्यता कक्ष येथे संपर्क साधता येणार आहे. यासाठी (07233) 246032 हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण करणाèया नागरिकांना नमुना-6 द्वारे नवीन मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.