अहिल्यानगर,
Suicide due to low marks in NEET नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील विद्यार्थिनी अंकिता सांगळे हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. अंकिताला नीट पुनर्परीक्षेत १६६ गुण मिळाले होते. या घटनेने जलालपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.अंकिता नीट परीक्षेच्या तयारीसाठी घरातील स्वतंत्र खोलीत अभ्यास करत होती. रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ती खोलीत गेल्यानंतर बराच वेळ कोणतीही हालचाल जाणवली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी खोलीत पाहिले असता ती गंभीर अवस्थेत आढळली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

अंकिताच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती मानसिक तणावाखाली होती. तिच्या चिठ्ठीतही नीट परीक्षेचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. अण्णा सांगळे यांनी दिलेल्या माहितीनंतर कर्जत पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, खासदार निलेश लांके यांनी अंकिता सांगळेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणात खासदार लांके यांनी सरकारवर गंभीर आरोप करत, अंकिताच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्यांविरोधात तसेच नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीशी संबंधित व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पेपरफुटीपूर्वी झालेल्या परीक्षेत अंकिताने चांगली कामगिरी केली होती, असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम पुन्हा चर्चेत आला आहे.यापूर्वी मे २०२६ मध्येही नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या मृत्यूची घटना समोर आली होती. परीक्षा रद्द झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनी नैराश्यात असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले होते. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या वाढत्या तणावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.