पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळाला

- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातील घटना

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर,
accused-escaped-from-police-custody : हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात असलेला कुख्यात गुन्हेगार पलिसांना गुंगारा देऊन सोमवारी सकाळी पोलिस ठाण्यातून पळून गेला. या घटनेमुळे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. एक्का उर्फ हर्ष महेंद्र रामटेके असे फरार आरोपीचे नाव असून, तो अट्टल गुन्हेगार आहे.
 
 

k 
 
 
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील रहिवासी असलेला एक्का हा मद्यपी असून, अमली पदार्थांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी तो विविध शहर, गावांमध्ये गुन्हे करतो. नागपूरमधील ओयो हॉटेलमध्ये मुक्काम करून तो चोरी, घरफोडी करतो. गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने २० जुलै रोजी त्याला, त्याचा साथीदार आणि त्यांच्याकडून चोरीचे सोने विकत घेणाऱ्या उमरेडच्या सराफाला अटक केली होती. पोलिसांनी त्याला तीन दिवसांपूर्वी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मानेवाडा हत्याकांडातील आरोपी ज्या लॉकअपमध्ये होते, त्याच लॉकअपमध्ये एक्कालाही ठेवण्यात आले होते.
 
 
सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्याने शौचालयात जाण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी त्याला बाहेरील शौचालयात नेले. पोलिसाचे दुर्लक्ष झाल्याची संधी साधून त्याने पोलिस ठाण्यातून पलायन केले. ही घटना उघड होताच पोलिस हादरले. शहरातील सर्व पोलिस स्टेशन, मोबाईल पथके, डी. बी. पथके, बीट मार्शल व सर्व पोलिस अधिकारी, अंमलदार यांना एक्का फरार झाल्याचे सांगून त्याचा तातडीने शोध घेण्याविषयी कळविण्यात आले. त्यानुसार, शहर पोलिस दल आरोपीला पकडण्यासाठी कामी लागले. मात्र, मध्यरात्रीनंतरही एक्का पोलिसांच्या हाती लागला नाही. तो अट्टल गुन्हेगार असूनही एक्काच्या फरार होण्याला कोण कारणीभूत आहे, त्याचा आता तपास केला जात आहे. यात दोषी आढळलेल्या पोलिसांवर कायदेशिर कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.