वॉशिंग्टन,
the ground shifted two feet इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त मोहिमेतील ‘निसार’ उपग्रहाने, मागील महिन्यात व्हेनेझुएलामध्ये आलेल्या दोन शक्तिशाली भूकंपांसंदर्भात महत्त्वपूर्ण पुरावे उघड केले आहेत. उपग्रहाच्या माहितीच्या विश्लेषणातून या प्रचंड भूकंपांमुळे अनेक भागांमध्ये सुमारे ६० सेंटीमीटर म्हणजेच दोन फूटाने जमिनीची हालचाल झाली, असे दिसून आले आहे. ज्यामुळे राजधानी कॅराकस आणि ला ग्वायरा येथे विनाशकारी विध्वंस झाला.
शास्त्रज्ञांनी २४ जूनच्या भूकंपापूर्वी आणि नंतर ‘निसार’ उपग्रहाने घेतलेल्या पृथ्वीच्या प्रतिमांचा अभ्यास केला. भूकंपानंतर जमिनीच्या पृष्ठभागात झालेले बदल निश्चित करण्यासाठी, १३ आणि १८ जूनच्या प्रतिमांची तुलना २५ आणि ३० जून रोजी घेतलेल्या माहितीशी करण्यात आली. जमिनीच्या पृष्ठभागातील सूक्ष्म बदल शोधण्यासाठी, शास्त्रज्ञांनी ‘इंटरफेरोमेट्रिक सिंथेटिक अपर्चर रडार’ तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्र उपग्रह आणि जमीन यांच्यातील अंतरातील बदल शोधण्यासाठी, उपग्रहाच्या वारंवार होणाऱ्या फेऱ्यांदरम्यान गोळा केलेल्या माहीतीची तुलना करते.
मोठ्या भूकंपामुळे जमिनीच्या पृष्ठभागात झालेल्या बदलांचे नकाशे तयार करण्यासाठी ‘निसार’च्या तातडीच्या प्रतिसाद प्रणालीचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमधील भूभौतिकशास्त्रज्ञ एरिक फील्डिंग यांच्या मते, भूकंपाची फॉल्ट लाईन समुद्रातून पूर्वेकडे पसरली आणि कॅराकसच्या उत्तरेकडील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ किनाऱ्यावर परत आली. या भागाच्या अगदी दक्षिणेला, जमिनीचे सर्वात मोठे विस्थापन अंदाजे ६० सेंटिमीटर म्हणजेच दोन फूट होते, म्हणूनच कॅराकस आणि ला ग्वायरा येथे इतका व्यापक विध्वंस झाला.
एरिकच्या मते, भूकंपादरम्यान नेमके काय घडले हे समजून घेण्यासाठी ‘इनसार’ तंत्रज्ञानाने शास्त्रज्ञांना लक्षणीय मदत केली आहे. ‘निसार’ उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण थेट डोक्यावरून न करता, सुमारे ४० अंशांच्या कोनातून करतो. यामुळे त्याला जमिनीचे क्षैतिज आणि उभ्या दोन्ही प्रकारचे विस्थापन नोंदवता येते.
४९ सेकंदाच्या भूकंपात पाच हजार जणांचा मृत्यू
२४ जून रोजी उत्तर व्हेनेझुएलामध्ये ७.२ तीव्रतेचा भूकंप झाला. अवघ्या ३९ सेकंदांनंतर, ७.५ तीव्रतेचा आणखी एक शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपांमध्ये पाच हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अंदाजे १६,७०० लोक जखमी झाले. काराकास आणि ला ग्वायरा व्यतिरिक्त, त्रुहियो, याराकुय, काराबोबो, अरागुआ आणि मिरांडा या राज्यांनाही याचा फटका बसला.