मुंबई,
dahi handi आगामी गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गोविंदांच्या सुरक्षेसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील तब्बल दोन लाख गोविंदांना आता विमा संरक्षण दिले जाणार असून, या प्रक्रियेला तातडीने सुरुवात करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील हजारो गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दहीहंडीचा सराव करताना आणि प्रत्यक्ष उत्सवादरम्यान थरांवरून पडून गोविंदा जखमी होण्याच्या घटना वारंवार घडतात. या संभाव्य धोक्याची दखल घेत, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे गोविंदांना भक्कम विमा संरक्षण देण्याची मागणी लावून धरली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, शासनाने संबंधित विभागांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
दहीहंडी हा केवळ एक उत्सव नसून ती महाराष्ट्राची एक ज्वलंत सांस्कृतिक परंपरा आहे. या परंपरेचे जतन करताना गोविंदांच्या जिवाची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. सरकारच्या या तत्पर निर्णयामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव अधिक निर्धास्त आणि सुरक्षित वातावरणात पार पडेल, असा विश्वास गोविंदा पथकांकडून व्यक्त केला जात आहे.
विमा संरक्षणाची व्याप्ती वाढवली
विशेष म्हणजे, यापूर्वी राज्यातील केवळ एक लाख गोविंदांनाच या विमा योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, यंदा या संख्येत दुप्पट वाढ करून हा आकडा दोन लाखांवर नेण्यात आला आहे. या महत्वपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी ‘महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन’च्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.