तभा वृत्तसेवा,
मुंबई,
rain-news : मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, विदर्भासह संपूर्ण राज्यावर पुन्हा एकदा पावसाचे ढग दाटून आले आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत तसेच पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार असल्याने येथे ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

घाटमाथ्यापासून ते किनारपट्टीपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. २७ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्यांच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तर मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि सिंधुदुर्ग या भागातही पावसाची संततधार राहणार असून येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, जळगावसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर भागातही पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भातही पावसाची जोरदार बॅटिंग
संपूर्ण राज्यासोबतच विदर्भातही पावसाचा जोर वाढणार आहे. बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आजपासूनच यलो अलर्ट देण्यात आला आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला आणि वाशिमसह संपूर्ण विदर्भात पुढील चार दिवस वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. २९ जुलै हा विदर्भासाठी सर्वाधिक सतर्कतेचा दिवस असणार असून, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' दिला आहे.
चार दिवसांचा हवामान अंदाज आणि सतर्कतेचा इशारा
२७ आणि २८ जुलै: रायगड, रत्नागिरी, पुणे व साताऱ्याच्या घाट परिसरात ऑरेंज अलर्ट. तसेच मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, मराठवाडा आणि नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत यलो अलर्ट.
२९ आणि ३० जुलै: विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याने ऑरेंज अलर्ट. नाशिक, जळगाव, मराठवाडा आणि उर्वरित विदर्भ तसेच कोकण व घाटमाथ्यावर यलो अलर्ट राहील.