नागपूर,
vidya bharatis annual general meeting विद्या भारती विदर्भ न्यासाची २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा भारतीय उत्कर्ष मंडळ सभागृह, खापरी (परसोडी) येथील प्रांत कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी विद्या भारती विदर्भचे अध्यक्ष सचिन जोशी होते. यावेळी व्यासपीठावर पश्चिम क्षेत्र उपाध्यक्ष शेषाद्री डांगे, प्रांत मंत्री रोशन आगरकर उपस्थित होते. याप्रसंगी कोषाध्यक्ष अमित भालेराव, माजी अध्यक्ष रमेश धारकर, आजीवन सदस्य अशोक दवंडे, नानासाहेब खारपाटे यांच्यासह विदर्भ प्रांतातील सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी दिवंगत झालेले पूर्वोत्तर संघटन मंत्री विराग पाचपोर, गुजरात प्रदेश संघटन मंत्री महेश पतंगे व राष्ट्रसेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या शुभदा जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले. सभेत २०२५-२६ चा वार्षिक कार्यवृत्त सादर करण्यात आला. प्रामुख्याने शिशुवाटिका ताईंचे प्रशिक्षण, आचार्य प्रशिक्षण वर्ग, सरस्वती शिक्षा यात्रा आदीबाबत माहिती देण्यात आली.
आगामी काळात वंदे मातरम् च्या दीडशेव्या वर्षानिमित्त २५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता सामूहिक वंदे मातरम् गायन कार्यक्रम घेण्याचे आवाहन व संत शिरोमणी रोहिदासांच्या ६५० व्या प्रकट वर्षानिमित्त विविध कार्यक्रम शाळांनी घ्यावे असेही आवाहन करण्यात आले. यावेळी विद्या भारती विदर्भ प्रांताच्या कार्याचा आढावा घेताना सध्या प्रांतात ६० विद्यालये व ३० शिशुवाटिका संलग्न असून भारतीय संस्कारप्रधान, गुणवत्तापूर्ण आणि राष्ट्रनिष्ठ शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.