नागपूर,
vishwas-nangre-patil : रामदेवबाबा विद्यापीठात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित इंडक्शन प्रोग्राम २०२६ चे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील प्रमुख वक्ते होते.
रामदेवबाबा सार्वजनिक समितीचे महासचिव राजेंद्र पुरोहित, रामदेवबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश पांडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. यशवंत सोनखासकर, प्रथम वर्ष प्रभारी प्रा. पी. द्वारमवार आदींसह प्राध्यापक, कर्मचारी, नव्याने प्रवेशित विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन। स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते॥’ हा संस्कृत श्लोक उद्धृत करीत विश्वास नांगरे पाटील यांनी ज्ञानाचे चिरंतन महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी उत्तम चारित्र्य घडवावे, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहावे. विद्यार्थ्यांच्या चारित्र्यनिर्मितीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यशाचा पाया हा चिकाटी व शिस्त यांवर उभा असतो. जीवनातील प्रत्येक आव्हानासाठी सातत्यपूर्ण तयारी करा. वाचनाची सवय जोपासावी, सातत्याने ज्ञानार्जनात गुंतवणूक करावी, नकारात्मक प्रभावांपासून दूर राहावे. जबाबदार नागरिक घडविणारी मूल्ये अंगीकारावीत, असा हितोपदेश करीत विश्वास नांगरे पाटील यांनी ‘देश के सम्मान में, अडिग कर्तव्यों की, अविचल परिपाटी हूँ, मैं खाकी हूँ’ हे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसमवेत छायाचित्रही (सेल्फी) काढले.