चांदूर रेल्वे,
wolf-attack : मौजा झिबला परिसरातील येरड ते बेलोरा धामक मार्गावरील पुलाखाली सोमवारी चार बकऱ्या व एक बोकड मृतावस्थेत आढळून आले. या जनावरांचा मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यात झाला असून, लांडग्याच्या हल्ल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला.
मृत जनावरे ही खरबी मांडवगड येथील रहिवासी गिरजा मेश्राम यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे. सोमवारी सकाळी सुभाष मेश्राम बकऱ्या चराईसाठी घेऊन गेले होते. काही वेळासाठी ते बाहेर गेल्यानंतर परत आले असता चार बकऱ्या व एक बोकड दिसले नाही. त्यांनी शोधाशोध केली असता सकाळी पुलाखाली सर्व जनावरे मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे वनविभागाचे वनपाल ए. आय. शेख, वनरक्षक एस. एस. सोळुंके तसेच वनमजूर वसंत राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
२१ जुलै रोजी येरड गावातील जुन्या गावठाण परिसरात तसेच शेतशिवारात वन्यप्राण्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरेही बसविले होते. आता पाच जनावरे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात वाघ, बिबट्या की लांडगा? असा संभ्रम निर्माण झाला आहे.शासकीय मदतीची मागणी या हल्ल्यात पाच जनावरे दगावल्यामुळे संबंधित पशुपालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाला वनविभागामार्फत तातडीने शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.