तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-municipal-council : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक व गटनेते डॉ. नीरज वाघमारे यांनी रविवारी, 26 जुलै स्वखर्चातून प्रभाग क्रमांक 10 मधील वैशालीनगर, रंभाजीनगर, माधवनगर आणि वाघापूर परिसरात तणनाशक फवारणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला.
परिसरातील नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या की, पावसाळ्यात वाढलेेल्या गवतामुळे रात्रीच्या वेळी मोकळ्या मैदानात किंवा रस्त्याच्या कडेला फिरताना साप व इतर सरपटणारे प्राणी दिसत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.वाघमारे यांनी तणनाशक वापरून संपूर्ण परिसरात फवारणी करण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेसाठी त्यांनी स्वतः तणनाशक, फवारणीसाठी आवश्यक पंप तसेच कुशल कामगारांची व्यवस्था स्वखर्चातून केली.
विशेष म्हणजे फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या पंपाच्या पुढील व मागील बाजूस यवतमाळ नगर परिषदेचा जाहीर निषेध असे फलक लावून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी डॉ. नीरज वाघमारे म्हणाले, शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या गवताची नियमित साफसफाई व तणनाशक फवारणी करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची महत्त्वाची जबाबदारी आहे.
पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आले असतानाही अनेक भागांत आवश्यक ती उपाययोजना झालेली नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी स्वतः पुढाकार घेऊन ही मोहीम राबविण्यात आली.
प्रभाग 10 मधील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत, शहरातील इतर भागांतही अशाच प्रकारे तातडीने तणनाशक फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी केली. तसेच यापुढे तरी नगर परिषद प्रशासनाने नागरिकांच्या अडचणी ओळखून वेळेवर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.