अमरावती,
accident-on-the-rajapeth-flyover : अत्यंत वर्दळीच्या राजापेठ येथील रेल्वे उड्डाणपुलावर टिप्परने ई-दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. अपघातानंतर टिप्परचालक पळून गेला.
हर्षा आदेश गावंडे (३९, रा. देवरा) आणि गौरी प्रमोद धर्माळे (२७, रा. बोरगाव धर्माळे) अशी मृत महिलांची नावे आहेत. पावसादरम्यान घडलेल्या या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. माहितीनुसार, दोन्ही महिला ई-दुचाकीने जात असताना उड्डाणपुलाच्या शेवटच्या टोकावर टीप्परने त्यांच्या वाहनाला मागून भीषण धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा पण मृत्यू झाला. एका महिलेने डोक्यात हेल्मेट परिधान केले होते, मात्र धडक इतकी तीव्र होती की तिचा जीव वाचू शकला नाही.
घटनेची माहिती मिळताच राजापेठचे ठाणेदार संदीप चव्हाण, वाहतूक पोलिस निरीक्षक निलेश गावंडे आणि वाहतूक एसीपी संजय खताळे यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही महिलांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले.
//टिप्परचालक पसार, शोध सुरू
अपघात घडल्यानंतर टिप्पर चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पोबारा केला. संबंधित टिप्परला नंबर प्लेट नसल्यामुळे चालक व वाहनाचा क्रमांक अद्याप स्पष्ट होऊ शकलेला नाही. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार अज्ञात टिप्पर चालकाचा कसून शोध घेतला जात आहे. या टिप्परमधून बांधकामासाठी वापरली जाणारी चुरी वाहून नेली जात होती.
//प्रवेशद्वाराच्या कामामुळे वाहतूक कोंडी
राजापेठहून अंबादेवीकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवेशद्वाराचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे, त्यामुळे राजकमल चौक ते बडनेरा या मार्गावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. वाहतूक पोलिस यंत्रणा हेल्मेट सक्ती राबवण्यात व्यस्त आहे. प्रवेशद्वारांच्या बांधकामांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असतानाही यावर अजूनही लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे. शहरात वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.