नागपूर,
ain wreaks havoc in Nagpur मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागपूर शहराला अक्षरशः वेढा घातला. अनेक सखल भाग जलमय झाले असून त्याचा सर्वाधिक फटका सोमलवार निकालस आणि सोमलवार खामला या शाळांना बसला. शाळेच्या परिसरात तब्बल ३ ते ४ फूट पाणी साचल्याने सुमारे ८०० विद्यार्थी शाळेतच अडकून पडले. परिस्थिती गंभीर होताच अग्निशमन दल, स्थानिक नागरिक आणि पालकांनी तातडीने बचावमोहीम हाती घेत विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. सततच्या पावसामुळे शाळेचे मैदान, प्रवेशद्वार आणि लगतचे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, थेट चालत जाणेही धोकादायक ठरत होते. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाच्या पथकाने दोरीच्या साहाय्याने सुरक्षित मार्ग तयार केला. पालक आणि स्थानिक नागरिकांनी मानवी साखळी उभी करून विद्यार्थ्यांना एकामागोमाग एक सुरक्षित स्थळी पोहोचवले. इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची या पद्धतीने सुटका करण्यात आली.
स्थानिकांच्या मते, पावसाळ्याच्या काळात शाळेसमोरील रस्त्याचे काम सुरू असल्याने आणि ते अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रस्त्यावरील खड्डे आणि निचऱ्याच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे ही परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचा आरोप पालकांनी केला आहे. योग्य नियोजन आणि वेळेवर काम पूर्ण झाले असते, तर विद्यार्थ्यांवर अशी वेळ आली नसती, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.अग्निशमन दल, स्थानिक नागरिक आणि पालकांच्या वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे सुमारे ८०० विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.