गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पुस्तक प्रकाशन सोहळा!

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
नागपूर,
book-launch-ceremony : वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांचा प्रकाशन सोहळा बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. 'सिद्धस्तोत्रमणि – चैतन्यदायी आणि व्याधिनाशक स्तोत्रसंग्रह' (मराठी) आणि 'Naad Sudha – The Eternal Elixir of Music Therapy' (इंग्रजी) या पुस्तकांचे प्रकाशन या सोहळ्यात होणार आहे. या दोन्ही ग्रंथांच्या लेखिका डॉ. इंद्रायणी केदार जोशी-श्रीगिरीवार या आयुर्वेदतज्ज्ञ, संगीतोपचारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ, संशोधक आणि लेखिका आहेत. भारतीय ज्ञानपरंपरा, अध्यात्म, आयुर्वेद आणि संगीत यांचा समन्वय साधत त्यांनी समाजोपयोगी स्वरूपाचे हे दोन अभ्यासपूर्ण ग्रंथ साकारले आहेत.
 
 
jkl
 
 
 
'सिद्धस्तोत्रमणि – चैतन्यदायी आणि व्याधिनाशक स्तोत्रसंग्रह' हा केवळ स्तोत्रांचा संग्रह नसून अभ्यासपूर्ण संदर्भग्रंथ आहे. विविध देवतांची फलदायी स्तोत्रे, त्यांचे महत्त्व, पुराणांमधील संदर्भ, स्तोत्रपठणाचा शरीर, मन आणि विविध व्याधींवरील परिणाम, तसेच श्रद्धा, अध्यात्म आणि आरोग्य यांचा परस्परसंबंध यांचे सविस्तर विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे. दैनंदिन उपासना, संस्कार आणि सकारात्मक जीवनमूल्ये जोपासण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे. 'Naad Sudha – The Eternal Elixir of Music Therapy' हे संगीतोपचार विषयावरील संशोधनाधिष्ठित इंग्रजी पुस्तक असून भारतीय संगीतशास्त्र, आयुर्वेद, आधुनिक वैद्यकशास्त्र आणि न्यूरोसायन्स यांच्या आधारे संगीताच्या उपचारक्षमतेचा अभ्यास यात मांडण्यात आला आहे. संगीताचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर होणारा परिणाम तसेच विविध व्याधींमध्ये संगीतोपचाराचा उपयोग आणि संशोधनाधारित उपचारपद्धतींची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
 

jkl 
 
 
या सोहळ्यास पद्मश्री डॉ. विलास डांगरे, डॉ. अतुल नारायण वैद्य, प्रा. चंद्रकांत लक्ष्मण चन्ने, दिपश्री पाटील, धनंजय सूर्यवंशी तसेच भागवताचार्य श्रीराम महाराज जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमात पुस्तकांचे प्रकाशन, लेखिकेचे मनोगत आणि मान्यवरांचे मार्गदर्शन होणार असून प्रकाशनानंतर दोन्ही पुस्तके विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना कु. वरदा साठे हिची शास्त्रीय नृत्यप्रस्तुती. भारतीय संस्कृती, अध्यात्म, साहित्य आणि संगीताचा सुंदर मिलाफ घडविणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी संस्मरणीय ठरणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्राची मुळे करणार आहेत. अध्यात्म, आरोग्य, संगीत आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी साहित्यप्रेमी, संशोधक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी, संगीतप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.