चंद्रपूर,
chandrapur-rain : चंद्रपूर महानगरासह जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असून, या पावसाने उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. धानपट्टयातील रखडलेल्या धान रोवणीच्या कामांना आता वेग येणार आहे. मंगळवारी सकाळपासूनच महानगरासह जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, बल्लारपूर, गोंडपिपरी, पोंभूर्णा, ब्रम्हपुरी, चिमूर, वरोडा, नागभीड, भद्रावती तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसाने जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ होणार आहे. पावसाअभावी दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, वेळेवर झालेल्या पावसामुळे हे संकट टळल्याने शेतकरी राजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
उद्या जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’; शाळांना सुट्टी
भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार, बुधवार, 29 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ दिला असून, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना 29 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.